शिक्षक उपस्थिती ५० टक्के, पण विद्यार्थ्यांच्या टक्क्याचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:49+5:302021-06-18T04:18:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मंगळवारपासून सर्व शाळांतील वर्ग ऑनलाईन सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी घरात बसूनच मोबाईलवरून अध्ययन करायचे ...

शिक्षक उपस्थिती ५० टक्के, पण विद्यार्थ्यांच्या टक्क्याचे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मंगळवारपासून सर्व शाळांतील वर्ग ऑनलाईन सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांनी घरात बसूनच मोबाईलवरून अध्ययन करायचे आहे. कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांना घरातच थांबवण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षकांच्या उपस्थितीचा गोंधळ मात्र संपलेला नाही.
सांगली जिल्हा परिषदेने सर्व शाळांतील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार व गरजेनुसार शिक्षकांनी एक दिवसाआड उपस्थितीचे नियोजन करायचे आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाईन अध्यापन करायचे आहे. दोननंतर संध्याकाळपर्यंत शालेय कामकाज करायचे आहे. काही ठिकाणी दुपारी दोननंतरही शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार ऑनलाईन अध्यापन करत आहेत.
जिल्हा परिषदेने ५० टक्के उपस्थितीची सूचना केली असली तरी शिक्षण उपसंचालकांनी मात्र स्थानिक कोरोना स्थितीनुसार निर्णय घेण्याची सूचना केली आहे, त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीचा चेंडू स्थानिक समित्यांकडे गेला आहे. सर्रास शाळांतील शिक्षकांना कोरोना ड्युटीवर नियुक्त केले आहे. चेकपोस्ट, कोविड केंद्रे, सर्वेक्षण आदी कामासाठी शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. त्या शिक्षकांना शाळेत येणे शक्य नाही. अशावेळी त्यांच्या विषयाच्या अध्यापनाचे काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. एखाद्या गावात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असेल तर तेथे शिक्षकांच्या उपस्थितीचे नियोजन काय? याचीही जबाबदारी निश्चित नाही.
बॉक्स
उपसंचालक म्हणतात...
- गावातील कोरोनास्थितीनुसार शिक्षकांच्या उपस्थितीचा निर्णय घ्यावा, असे शिक्षण उपसंचालकांचे म्हणणे आहे.
- जिल्हा कोरोनास्थितीमध्ये पहिल्या स्तरात असल्यास १०० टक्के उपस्थितीस परवानगी आहे. दुसऱ्या स्तराला ५० टक्के, तर तिसऱ्या स्तराला ३० टक्केची परवानगी आहे.
- यानंतरही याबाबतचा निर्णय स्थानिक कोरोना दक्षता समिती, विद्या समिती व शाळा समित्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती बैठकीनंतर घ्यायचा आहे.
सांगलीत सर्वत्र ५० टक्के...
- सांगलीत जिल्ह्यात सर्रास माध्यमिक शाळांत ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती दिसत आहे.
- जिल्हा तिसऱ्या स्तरावर असला तरी शिक्षकांची उपस्थिती मात्र जास्त आहे.
- कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना उपस्थितीमध्ये सूट मिळाली आहे, त्यांचे तास अन्य शिक्षक घेताहेत.
कोट
दोनपर्यंतच अध्यापन
शासनाच्या आदेशानुसार सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत अध्यापन सुरू आहे. उपस्थिती ५० टक्के आहे. एक दिवसाआड अध्यापन सुरू आहे. कोरोना ड्युटीवरील शिक्षकांना उपस्थितीची सक्ती शासनाने केलेली नाही. पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे.
- परेश पाटील, शिक्षक
सकाळी दहापासूनच वर्गात ऑनलाईन अध्ययन सुरू आहे. त्याशिवाय फोनवरून पालकांच्याही संपर्कात आहोत. दिवसभराचे अध्यापन पाल्याकडून घरातही करून घेण्यास सांगत आहोत. सध्या ५० टक्के उपस्थितीसाठी एक दिवसाआड नियोजन केले आहे.
- राजेंद्र पाटील, शिक्षक
शाळांमध्ये शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शासनाने सांगितली आहे. त्यानुसार कोणत्या शिक्षकाने कधी उपस्थित राहायचे याचे नियोजन स्थानिक स्तरावर शालेय प्रशासनाने करायचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून १०० टक्के उपस्थितीसाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे.
- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
पॉईंटर्स
जिल्हा परिषद शाळा - १,६८८
माध्यमिक शाळा - ७१७
महापालिका क्षेत्रात शाळा - ५१
नगरपालिकेच्या शाळा ३५
एकूण शाळा २,४९१
शिक्षक - ९,६७४