'कर सर्वाधिक, सुविधा नगण्य
By Admin | Updated: March 7, 2016 00:37 IST2016-03-06T23:25:28+5:302016-03-07T00:37:00+5:30
महापालिकेची स्थिती : नवी मुंबईपेक्षा घरपट्टी अधिक

'कर सर्वाधिक, सुविधा नगण्य
सांगली : पाणीपट्टी आणि घरपट्टीच्याबाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक दर लावून नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लावणाऱ्या महापालिकेने सुविधांबाबत नेहमीच ठेंगा दाखविला आहे. नवी मुंबईपेक्षा जवळपास दुप्पट असलेली सांगलीची पाणीपट्टी आता आणखी तीन रुपयांनी वाढविली जाणार आहे. शासनाच्या भांडवली मूल्यावरील घरपट्टीपेक्षाही अधिक दर तिन्ही शहरांमधील साधारण घरपट्टीचे आहेत. त्यामुळे नागरिकांच्या शोषणाची परंपरा कायम ठेवण्याकडे आता सत्ताधाऱ्यांचा कल दिसत आहे.
सत्ताधाऱ्यांनी गतवर्षी पाणी पुरवठ्याच्या खासगीकरणाचा घाट घातला होता. त्याला मदनभाऊ युवा मंचने विरोध करून राज्यातील अन्य महापालिकांच्या पाणीदराची यादी सादर केली होती. या यादीत नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, पुणे आदी महापालिकांचे पाणीदर हे सांगली, मिरजेतील पाणीपट्टीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले होते. विरोध वाढल्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण रद्द करण्यात आले, मात्र पाण्याचे दर कायम ठेवण्यात आले. आता यात आणखी तीन रुपयांची वाढ करून नवा झटका देण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यात कोणत्याही महापालिकेचा दर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेएवढा नाही.
याठिकाणचा दर सर्वाधिक असल्यामुळे, मीटर सुरू करून पाणी आकारणी चालू झाली, तर लोकांना प्रतिमाह ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टी येऊ शकते. त्यामुळे या दराने पाणीपट्टी परवडणारी नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना करवाढीचे झटके काँग्रेसच्या सत्ताकाळात अनुभवास मिळणार आहेत.
राज्य शासनाने काही वर्षांपूर्वीच भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिकांना केली होती. राज्यातील अनेक महापालिकांनी नागरिकांवर करवाढीचा भुर्दंड बसण्याचे कारण दाखवून भांडवली मूल्यावरील घरपट्टी लागू करण्याबाबत चालढकलपणा केला होता. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात याबाबत एक अजब गोष्ट घरपट्टीच्याबाबतीत घडली आहे. भांडवली मूल्यावरील घरपट्टी लागू केल्यास घरपट्टीचे उत्पन्न कमी होईल, अशी भीती खुद्द सत्ताधाऱ्यांनीच व्यक्त केली.
कारण साधारण घरपट्टी ही भांडवली मूल्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षात महापालिकेने करवाढीतून छळले. सुविधांबाबत मात्र ठेंगा दाखविला. करांचा हा अतिरिक्त डोस पाजून महापालिका क्षेत्रातील जनतेचे आर्थिक गणित बिघडविण्याचे काम करीत आहे. स्वत:च्याच घरात भाड्याने राहण्याचा अनुभव ही महापालिका देत आहे. (प्रतिनिधी)
महापालिका प्रति हजार लिटर दरवार्षिक घरपट्टी
पुणे -२५५०
सोलापूर-२७६६
पिंपरी-चिंचवड२.५० रुपयेसरासरी १५० रुपये महिना
कोल्हापूर -१९० रुपये दोन महिन्यांसाठी
नवी मुंबई४.७५ रुपयेसोसायटी ग्राहकास मासिक १५०
सांगली८ रुपये सरासरी ३४० दोन महिन्यांसाठी