तासगाव नगराध्यक्ष निवड २९ रोजी
By Admin | Updated: September 18, 2015 23:33 IST2015-09-18T23:26:33+5:302015-09-18T23:33:09+5:30
निवडणूक कार्यक्रम जाहीर : सुशिला साळुंखेंचे नाव आघाडीवर

तासगाव नगराध्यक्ष निवड २९ रोजी
तासगाव : तासगाव नगरपालिकेत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर नगराध्यक्ष संजय ऊर्फ अजय पवार यांनी राजीनामा दिला. नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांनी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २९ सप्टेंबरला नगराध्यक्ष निवड होणार आहे. पालिकेत भाजपचा पहिलाच नगराध्यक्ष होणार असल्याने उत्सुकता आहे. अद्याप नाव जाहीर झाले नसले तरी, सुशिला साळुंखे यांचे नाव आघाडीवर आहे.
तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे एकमेव नगरसेवक संजय पवार यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. मात्र राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर पाच नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली. खासदार संजयकाका पाटीलसमर्थक नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करत नगराध्यक्षांविरोधात १८ पैकी १६ जणांनी अविश्वास ठराव दाखल केला. त्यानंतर तात्काळ नगराध्यक्ष पवार यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनीही हा राजीनामा मंजूर केला.
नव्या नगराध्यक्ष निवडीसाठी प्रांताधिकारी बोरकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांनी नगराध्यक्षपदाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या सुशिला साळुंखे आणि रजनीगंधा लंगडे यांना उर्वरित कालावधित नगराध्यक्ष पदासाठी शब्द दिल्याची चर्चा आहे.
त्यामुळे नगराध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या टर्मसाठी सुशिला साळुंखेंचे नाव आघाडीवर आहे. २९ सप्टेंबररोजी होणाऱ्या निवडणुकीकडे आता लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
नगराध्यक्ष निवडीचे सोपस्कार
विद्यमान नगराध्यक्षांविरोधात सोळा नगरसेवकांनी एकत्रित येत अविश्वास ठराव दाखल केला होता. यापुढे पालिकेच्या राजकारणात विरोधी बाकावर दोनच नगरसेवक राहणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष निवड बिनविरोध होण्याची शक्यताच अधिक आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे. नगराध्यक्ष निवडीकडे आता तासगाव शहराचे लागून राहिले आहे.