तासगावच्या समस्या मार्गी लावणार

By Admin | Updated: October 1, 2015 23:01 IST2015-10-01T23:01:47+5:302015-10-01T23:01:47+5:30

नगराध्यक्षा सुशिला साळुंखे : रखडलेल्या योजना पूर्ण करण्यास प्राधान्य--थेट संवाद

Tasgaon's problems will be resolved | तासगावच्या समस्या मार्गी लावणार

तासगावच्या समस्या मार्गी लावणार

तासगाव : तासगाव शहराच्या विकासाबाबतीत असलेल्या सर्व समस्या मार्गी लावल्या जातील. नगरपालिकेची महत्त्वाकांक्षी पाणी योजना अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. या योजनेसह रखडलेल्या सर्व योजना पूर्ण करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याची माहिती तासगावच्या नूतन नगराध्यक्षा सुशिला साळुंखे यांनी गुरुवारी दिली. यावेळी नगरसेवक अविनाश पाटील उपस्थित होते.तासगाव शहरातील विकासाच्या अनेक योजना वर्षानुवर्षे रखडलेल्या आहेत. काही योजनांचे काम निकृष्ट झाले आहे. शहरातील व्यापारी संकुल, झोपडपट्टीधारकांच्या घरकुलांचा प्रश्न आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या पालिकेकडून असलेल्या अपेक्षा याबाबत ‘लोकमत’मधून ‘विकासातून हवा तासगावचा कायापालट’ या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द करण्यात आली होती. त्याची दखल घेत, नगराध्यक्ष साळुंखे यांनी रखडलेल्या योजना प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शहरातील झोपडपट्टी धारकांचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. नवीन घरकुलांच्या वाटपाबाबत धोरण निश्चित करुन, उर्वरित झोपडपट्टी धारकांच्या घरकुलांसाठी नव्याने निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेली पाणी योजना तातडीने पूर्ण करण्यात येईल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर विस्तारित भागाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दोन महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘चोवीस तास पाणी’ योजना राबविण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व शहरासाठी चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच शहराच्या वाहतुकीची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रलंबित रिंग रोडचा प्रश्नही खासदार संजयकाकांच्या पुढाकाराने मार्गी लावण्यास माझे प्राधान्य असणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचीही मदत घेणार असल्याचे नगराध्यक्षा साळुंखे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक अविनाश पाटील, राजू म्हेत्रे, शरद मानकर, जाफर मुजावर, सारिका कांबळे, विजया जामदार, सिंंधुताई वैद्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

बगीचा, बॅडमिंटन कोर्टची सुविधा देणार
शहरातील उच्च मध्यमवर्गीयांसाठी सुसज्ज असा बगीचा लवकरच खुला करण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक हॉल आणि बॅडमिंटन कोर्टची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच नगरपालिकेची नवीन इमारतही उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी खासदार संजयकाकांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही नगराध्यक्षा सुशिला साळुंखे यांनी सांगितले.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे खासदार संजयकाका पाटील या सत्तेच्या माध्यमातून पालिकेला शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देऊ शकतात. याच मुद्द्यावर आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्याची ग्वाही संजयकाकांनी दिली आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचा कारभार विकासाभिमुख आणि पारदर्शी करू.
- सुशिला साळुंखे, नगराध्यक्षा.

Web Title: Tasgaon's problems will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.