तासगावला सेनापती आणि मावळे सारेच फिल्डवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:26 IST2021-05-09T04:26:46+5:302021-05-09T04:26:46+5:30
महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोरोना रुग्णालयात शनिवारी ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली, तेव्हा खासदारांच्या मावळ्यांनी ३२ जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले. ...

तासगावला सेनापती आणि मावळे सारेच फिल्डवर
महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कोरोना रुग्णालयात शनिवारी ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली, तेव्हा खासदारांच्या मावळ्यांनी ३२ जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले. अनिल कुत्ते, जाफर मुजावर, शरद मानकर आदींनी त्यासाठी रात्र जागविली. प्रसंगी तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातूनही सिलिंडर मिळविले.
तासगाव तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. लोकप्रतिनिधीही पाठीशी राहिल्याने प्रशासनाचे मनोबल उंचावले आहे. पुढील टप्प्यात गावोगावी विलगीकरण केंद्रांची गरज आहे. गावात बेबंदपणे फिरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या बंदोबस्तासाठी ग्रामीण भागात यंत्रणा वेगाने राबविणे गरजेचे आहे. नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी पृथ्वीराज माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप घाडगे, रामचंद्र अवताडे, अयुब मणेर, सुरेश देवकुळे, संजय माळी आदी फौजही मैदानात उतरली आहे.
चौकट
कवठेमहांकाळला वालीच नाही
कवठेमहांकाळला मात्र वालीच नाही, अशी अवस्था आहे. आढावा बैठकीत भीमगर्जना झाल्या, मागे फक्त गर्जनाच उरल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरशिवाय अन्य सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. बेडअभावी सर्रास रुग्णांना सांगली-मिरजेला पळवावे लागते. ढालगावच्या २५ बेडचा थोडाफार आधार आहे. गेल्या पंधरवड्यात शिक्षक संघटनेने काही ऑक्सिजन यंत्रे उपलब्ध केली. जॉलीबोर्ड कंपनीने काही वेळा गावात फवारणी केली. बाकी रुग्णांचा भरवसा स्वत:च्या पुण्याईवरच आहे. ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरच ते तग धरून आहेत. प्रशासनाची कोरोनाविरोधात एकाकी झुंज सुरू आहे.