तासगाव पालिकेचे राजकारण बदलणार

By Admin | Updated: May 12, 2016 00:13 IST2016-05-11T23:06:13+5:302016-05-12T00:13:57+5:30

थेट नगराध्यक्ष निवडीने नेत्यांची कसोटी; आरक्षणाची उत्सुकता; संगीत खुर्ची थांबणार

Tasgaon municipal politics changed | तासगाव पालिकेचे राजकारण बदलणार

तासगाव पालिकेचे राजकारण बदलणार

दत्ता पाटील ---तासगाव  -नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांऐवजी, थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची समीकरणे बदलणार आहेत. थेट नगराध्यक्ष पाच वर्षांसाठी असल्याने संगीत खुर्चीचा खेळ थांबणार असून, नेत्यांची कसरतही थांबणार आहे. मात्र थेट नगराध्यक्ष होण्यासाठी प्रभावी उमेदवाराचे समीकरण जुळवून आणावे लागणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे. खुल्या गटातील इच्छुकांची आतापासूनच चर्चा होत आहे. मात्र आरक्षणाच्या निर्णयावरच पुढील वाटचाल निश्चित होणार आहे.
तासगाव नगरपालिकेत गेल्या काही वर्षांत नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची झाली आहे. गेल्या चार वर्षांत पालिकेत आघाडी, तडजोडीने गटा-तटांची सत्ता आली. सहा महिन्यांपूर्वी भाजपची एकहाती सत्ता आली. मात्र सत्ता कोणाचीही असली तरी, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्यासारख्या नेत्यांना सत्तेसाठी नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची करावी लागली. हा खेळ अद्यापही कायम आहे. इच्छुकांच्या मनसुब्यापुढे नेतृत्व हतबल झाल्याचे चित्र तासगावकरांना पाहायला मिळाले. किंंबहुना भाजपची सत्ता आल्यापासून तर नगराध्यक्ष पदासाठी पाठशिवणीचा खेळ सुरु असल्याचेच पाहायला मिळत आहे.
नगराध्यक्ष पदाच्या संगीत खुर्चीमुळे गेल्या काही वर्षातील एकाही नगराध्यक्षाचे काम लक्षणीय झाल्याचे पाहायला मिळाले नाही. यापूर्वी तासगावात दोन थेट नगराध्यक्ष झाले होते. दोघांचेही काम उल्लेखनीय होते. मात्र आताच्या नगराध्यक्षांकडून नावापुढे माजी जोडण्यापलीकडे फारसे काही होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे तासगावकरांना अपेक्षित विकास होत नसल्याची खंत आहे. आता थेट निवडीने संगीत खुर्चीचा खेळ थांबून पाच वर्षासाठी एकच नगराध्यक्ष राहणार असल्याने, येणाऱ्या काळात विकासात्मक चित्र पाहायला मिळेल, अशी जनतेची भावना आहे. तसेच या निर्णयामुळे निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदासाठी होणारे नाराजीनाट्य, कुरघोड्यांचे राजकारण आणि यामुळे नेतृत्वाला करावी लागणारी कसरत थांबणार आहे. त्यामुळे तासगावचा नगराध्यक्ष पदाचा इतिहास पाहिल्यास, नेत्यांनाही दिलासा देणारा हा निर्णय म्हणावा लागेल.
सहा महिन्यांत पालिकेची निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष निवडीचे भवितव्य शहरातील सुमारे पंचवीस हजार मतदार ठरविणार आहेत. त्यामुळे या पदासाठी निवडणूक लढवणारा उमेदवार सर्व शहरात प्रभाव असणारा असायला हवा. सद्यस्थिती सर्व शहरात छाप पडेल, असा उमेदवार दिसून येत नाही. खुले आरक्षण पडल्यास इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत दोन-चार नावांची चर्चादेखील सुरु झाली आहे.
भाजपमधून बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, राष्ट्रवादीतून अमोल शिंंदे, अजय पाटील यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरु आहे. तर काँग्रेससाठी तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांना स्वत: उभा राहण्याशिवाय पर्याय नसेल, तर अन्य आरक्षण पडल्यास उमेदवाराच्या प्रतिमेसोबत, नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे. एकंदरीत खमक्या उमेदवारावरच नगराध्यक्षपदाचे समीकरण अवलंबून असल्याने, आगामी निवडणुकीचे समीकरण बदलणार, हे निश्चित.


आरक्षण : निर्णयाकडे लक्ष
नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत तासगावच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. नव्या निर्णयामुळे हे आरक्षण कायम राहणार की बदलणार, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आरक्षण काय असेल, यावरच नगराध्यक्षपदाचे राजकीय गणित निश्चित होणार आहे. मात्र या निर्णयाने तासगावातील राजकीय वातावरण ढवळले असून, तूर्तास तरी खुल्या गटातील उमेदवारांच्याबाबतीतच चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे येथील राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Tasgaon municipal politics changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.