तासगाव नगरपालिकेची निवडणूक दुरंगी की तिरंगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:14+5:302021-02-23T04:42:14+5:30

दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीला अजून अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच शहरात नेते आणि कार्यकर्त्यांकडून जुळवाजुळव सुरू आहे. ...

Tasgaon municipal election two or three? | तासगाव नगरपालिकेची निवडणूक दुरंगी की तिरंगी?

तासगाव नगरपालिकेची निवडणूक दुरंगी की तिरंगी?

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीला अजून अवधी आहे. मात्र त्यापूर्वीच शहरात नेते आणि कार्यकर्त्यांकडून जुळवाजुळव सुरू आहे. सत्ताधारी भाजप स्वबळावर लढणार आहे, मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना स्वबळ आजमावणार की महाविकास आघाडी करून लढणार, याबाबत नेमके चित्र स्पष्ट नसल्याने इच्छुकांकडून गोंधळलेल्या अवस्थेतच मोर्चेबांधणी सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या भवितव्यावरच पालिकेतील लढत दुरंगी होणार की तिरंगी, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

तासगाव नगरपालिकेत गतवेळच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. या लढती राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली नसल्याचा फायदा भाजपला झाला होता. थेट नगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांतील मतविभागणीमुळे भाजपला नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली होती.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या अडेलतट्टू भूमिकेचा फायदा भाजपला झाला. भाजपने खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी खर्च करून पुन्हा स्वबळावर रिंगणात उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

बदलत्या राजकीय परिस्थितीत शहरात सत्ताधाऱ्यांविरोधात रोषाचे वातावरण आहे. मात्र त्याचा लाभ उठवण्यात विरोधक कितपत यशस्वी होतात, यावर पालिकेतील सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.

भाजपविरोधात राज्यात सत्तेत आल्याने आत्मविश्‍वास दुणावलेली राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत आहे, तर काँग्रेस आणि नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या कारभाऱ्यांनीही निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी झाली, तर भाजपपुढे आव्हान निर्माण होणार आहे. आघाडी नाही झाली, तर तिरंगी लढत होऊ शकते. मात्र आघाडी होणार की नाही, याबाबत नेमके चित्र स्पष्ट नसल्याने भाजप वगळता अन्य पक्षांतील इच्छुकांत गोंधळाचे वातावरण आहे.

चौकट

खासदारांच्या जुन्या शिलेदारांची मोर्चेबांधणी

एकेकाळी खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे काही शिलेदार काँग्रेस आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. बेरजेचे राजकारण करण्यासाठी भेटीगाठीचा धडाका सुरू झाला आहे.

चौकट

अंडरस्टॅन्डिंगच्या राजकारणाची धास्ती

नगरपालिका निवडणुकीत भाजपने कंबर कसली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या गोटात अंडरस्टॅन्डिंगच्या राजकारणाची धास्ती आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांशी अंडरस्टॅन्डिग करून निवडणुका झाल्या, तर पालिकेची निवडणूक नुरा कुस्तीसारखी होईल, याची धास्ती अनेकांनी घेतली आहे.

Web Title: Tasgaon municipal election two or three?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.