तासगाव नगराध्यक्षांचा आज राजीनामा

By Admin | Updated: September 13, 2015 22:35 IST2015-09-13T22:25:52+5:302015-09-13T22:35:02+5:30

राजकारणाला कलाटणी : सुमनताई, महादेव पाटील यांच्या सूचनेनंतर निर्णय

Tasgaon mayor resigns today | तासगाव नगराध्यक्षांचा आज राजीनामा

तासगाव नगराध्यक्षांचा आज राजीनामा

तासगाव : नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय पवार यांच्याविरोधात भाजपने सोमवारी अविश्वास ठराव आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली असतानाच नगराध्यक्ष पवार यांनी सोमवारी राजीनामा देणार असल्याची माहिती रविवारी पत्रकार बैठकीत दिली. आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या सूचनेनुसार राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नगरपालिकेत चौदा महिन्यांपूर्वी आबा गट आणि काका गटातील नगरसेवकांत फूट पडली. त्यावेळी दोन्ही गटांकडे समान संख्याबळ होते. काका गटाला शह देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक संजय पवार यांना नगराध्यक्ष पदाची आॅफर दिली. त्यामुळे पवार यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. मात्र दोन महिन्यांपासून पवार यांच्या उचलबांगडीसाठी आबा गटातील काही नगरसेविका आणि काका गटातील नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या आदेशाशिवाय राजीनामा देणार नसल्याचे नगराध्यक्ष पवार यांनी स्पष्ट केले होते.
आबा-काका गटातील नगरसेवकांनी एकत्रित येऊन अविश्वास ठराव आणण्याचे निश्चित केले होते. तसा इशाराही नगराध्यक्ष पवार यांना दिला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत काका गटाला सोबत घेण्यावरून फूट पडली. त्यामुळे अविश्वास ठराव बारगळणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र भाजपच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवकांना नगराध्यक्षपद देण्याचे आश्वासन देत खेचून घेतले, तर नगराध्यक्षांविरोधात नाराजी असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अविश्वास ठरावासाठी भाजपला पाठिंबा देण्यासाठी तयारी दाखवली. सोमवारी अविश्वास ठराव आणण्याचे निश्चित झाले होते. मात्र तत्पूर्वीच रविवारी सायंकाळी नगराध्यक्ष पवार यांनी पत्रकार बैठक घेऊन, सोमवारी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
आर. आर. पाटील आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्यात बैठक होऊन मला अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय झाला होता. आता आमदार सुमनताई पाटील आणि महादेव पाटील यांनीच मला राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी राजीनामा देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. नगराध्यक्षपदाच्या कामात अनेक विकासकामे केली आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रस्तावित आहेत. नगराध्यक्षपदाचा कारभार पारदर्शीपणे केला असून, शहराच्या विकासाच्यादृष्टीने अनेक कामांचा पाठपुरावा केला आहे. अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या समस्या मार्गी लावल्या आहेत. यापुढेही शहराच्या विकासासाठी सक्षमपणे काम करणार असल्याचे नगराध्यक्ष पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अमोल शिंदे, नगरसेवक जाफर मुजावर उपस्थित होते. (वार्ताहर)


नव्या नगराध्यक्षांची उत्सुकता
नगराध्यक्ष संजय पवार यांनी सोमवारी राजीनामा देण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नगरपालिकेत सद्यस्थितीत बहुमतात आलेल्या काका गटाचा नगराध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. आबा गटातून तीन नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत. त्यातील दोघांना नगराध्यक्षपदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे, तर काका गटातीलही काही नगरसेवक आणि खासदार संजयकाका समर्थक अपक्ष नगरसेवकही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नवा नगराध्यक्ष काका गटाचा होणार, हे निश्चित असले तरी कोण होणार? याची उत्सुकता आहे.

Web Title: Tasgaon mayor resigns today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.