तासगाव विकासाची सत्ताधाऱ्यांतर्फे पालखी

By Admin | Updated: December 17, 2015 23:19 IST2015-12-17T23:17:34+5:302015-12-17T23:19:42+5:30

खासदारांकडून भ्रमनिरास : नगराध्यक्षांच्या खांदेपालटाने विकासाला खोडा

Tasgaon Development Powered by the Legislators | तासगाव विकासाची सत्ताधाऱ्यांतर्फे पालखी

तासगाव विकासाची सत्ताधाऱ्यांतर्फे पालखी

दत्ता पाटील- तासगाव -नगरसेवकांची नाराजी रोखण्यासाठी नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची केली. साडेतीन वर्षापर्यंत ही परंपरा कायम राहिली. आता तोच पायंडा, भाजपचा झेंडा फडकवून सत्ता ताब्यात घेतलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्याकडूनही कायम राहिला आहे. येणारा प्रत्येक नगराध्यक्ष आश्वासनांच्या बाबतीत जुन्याच नगराध्यक्षांचा कित्ता गिरवत आहे. नगराध्यक्ष पदाच्या खांदेपालटाने शहराचा विकास आणि समस्यांना खोडा बसला आहे. पालिकेत सत्ता कोणाचीही असली तरी, सत्ताधाऱ्यांकडून शहर विकासाची पालखीच झाल्याचे चित्र आहे.तासगाव नगरपालिकेची चार वर्षापूर्वी झालेली निवडणूक आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील यांनी एकत्रित येत लढवली. दोन्ही नेत्यांवर विश्वास टाकून तासगावकरांनी एकहाती सत्ता सोपवली. सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच खुर्चीची महत्त्वाकांक्षा असलेल्या नगरसेवकांनी नेत्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांकडूनही नगराध्यक्ष पदाचे तुकडे पाडण्यास सुरुवात केली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना त्यासाठी कसरत करावी लागली. तरीदेखील त्यांना नाराजीचा फटका बसलाच. परिणामी, विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकालाही नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली. आर. आर. पाटील यांच्या पश्चातदेखील नगराध्यक्ष पदाच्या महत्त्वाकांक्षेचे धक्के आबा गटाला सहन करावे लागले. त्यातूनच पालिकेत आबा गटाची धुळदाण झाली.
पालिकेत राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांना गळ टाकून, खासदार संजयकाका पाटील यांनी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा वर्षानुवर्षे काका समर्थक म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या सुशिला साळुंखे यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली. मात्र साळुंखे खुर्चीवर विराजमान होताच महिन्याभरासाठी आचारसंहिता जाहीर झाली. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसून महिना होत नाही तोच, त्यांना पायउतार व्हावे लागले.
सत्तेची सूत्रे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे आल्यानंतर तरी किमान नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्ची थांबेल, अशी जनतेला अपेक्षा होती. मात्र खासदारांकडूनही याबाबत भ्रमनिरास झाला असून, नगरसेवकांच्या मर्जीसाठी पुन्हा ये रे माझ्या मागल्या, असेच धोरण अवलंबले आहे. गेल्या काही वर्षांत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर प्रत्येक नगराध्यक्षाकडून तासगावच्या विकासाचे व्हिजन जाहीर केले जाते. शहर विकासाचा अजेंडा जाहीर होतो. शहरातील समस्या आणि त्या मार्गी लावण्याबाबत आश्वासनांची खैरात होते. मात्र त्यांची पूर्तता कोणत्याच नगराध्यक्षाकडून होत नाही. नगराध्यक्ष नवा, मात्र प्रश्न तेच, असाच एकूण पालिकेच्या कारभाराचा रागरंग आहे. पालिकेच्या कारभाराच्या जत्रेत नगराध्यक्षांकडून केवळ आश्वासनांची पालखीच वाहिली जात आहे. ही पालखी विकासाच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचणार? आणि कोण पोहोचवणार? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

डी. एम. पाटील यांच्यानंतर कोण ?
माजी नगराध्यक्ष डी. एम. पाटील यांनी तासगाव शहरात खऱ्याअर्थाने विकास कामांना सुरुवात केली. त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सलग सहा वर्षे काम केले. त्यानंतरही चार वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम केले. एकहाती कारभार करता आल्यामुळे त्यांच्या काळात शिक्षण मंडळ स्थापना, सिध्देश्वर मार्केट, शिवाजी महाराजांचा पुतळा, स्टेशन रोडची निर्मिती, सांगली पूल, पाणी योजनांसह अनेक प्रश्न मार्गी लागले. आजही त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकीर्दीचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. मात्र त्यानंतर झालेल्या शॉर्ट टर्म नगराध्यक्षांना केवळ नावापुढे माजी हा शब्द लावण्यापलीकडे कोणतीही लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही.


काका गटाच्या ताब्यात सत्ता आल्यानंतर दोन महिन्यांसाठी सुशिला साळुंखे यांची निवड झाली. आता बाबासाहेब पाटील यांना तीन महिन्यांसाठी नगराध्यक्षपद दिल्याची चर्चा आहे, तर उर्वरित टर्ममध्ये आणखी दोन नगरसेवकांना संधी देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. तसेच उर्वरित इच्छुक नगरसेवकांना नगराध्यक्षपद देण्यासाठी महिन्याऐवजी दिवसावर संधी दिली जाणार काय? असा खोचक सवालही जनतेतून विचारला जात आहे.

Web Title: Tasgaon Development Powered by the Legislators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.