तासगावचा बेदाणा काश्मीर ते कन्याकुमारी
By Admin | Updated: September 8, 2015 23:09 IST2015-09-08T23:09:07+5:302015-09-08T23:09:07+5:30
बाजार समितीचा पुढाकार : गलाई बांधवांना देणार खरेदीचा परवाना

तासगावचा बेदाणा काश्मीर ते कन्याकुमारी
दत्ता पाटील - तासगाव -देशाच्या बेदाणा व्यवसायातील ३५ टक्के हिस्सा तासगाव बाजार समितीचा आहे. बेदाणा विक्रीला चालना देण्यासाठी आता तासगाव बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील गलाई बांधव देशाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेले आहेत. या गलाई बांधवांनाच आता खरेदीचा परवाना देण्यात येणार आहे. त्याबाबत गलाई व्यावसायिकांशी बोलणी झाली आहे. लवकरच गलाई बांधवांच्या माध्यमातून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत तासगावच्या बेदाण्याची विक्री सुरु होणार आहे.
राज्यात सर्वात पहिल्यांदा तासगाव बाजार समितीने बेदाणा मार्केटची सुरुवात केली. सद्यस्थितीत तासगावात वर्षाला सुमारे ४७ हजार टन बेदाण्याची विक्री होत असून पाचशे कोटींची उलाढाल होते. तासगावची बेदाणा बाजारपेठ विश्वासार्ह आणि चांगल्या दरासाठी प्रसिध्द असल्यामुळे महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूर, बार्शी, नाशिकसह कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात बेदाण्याची आवक होत असते. एकूण आवकेपैकी कर्नाटकचा हिस्सा सुमारे ७६ टक्के इतका आहे. कर्नाटकातून आवक वाढल्यामुळे स्थानिक बेदाणा उत्पादकांना काही प्रमाणात दराचा फटका बसत आहे. आवक जास्त झाल्यानंतर परराज्यातून खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दर कमी केला जातो.
बेदाणा दराबाबतची परराज्यातील व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात बेदाण्यासारखा सुकामेवा पोहोचवून अधिकाधिक विक्री व्हावी, यासाठी तासगाव बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील गलाई बांधव व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात स्थिरस्थावर झाले आहेत. एकाच घरातील अनेक लोक गलाई व्यवसायात आहेत. मात्र अलीकडच्या काळात काही कारणांनी मंदी आलेली आहे. त्यामुळे गलाई बांधवांना बेदाणा व्यवसायाची नवी संधी निर्माण करुन देण्यात येणार आहे. बेदाणा खरेदीचे परवाने देऊन गलाई व्यावसायिक राहत असलेल्या भागात, सुकामेवा असणाऱ्या बेदाण्याच्या विक्रीची संधी निर्माण करुन देण्यात येणार आहे. याबाबत गलाई व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी दिली.
जास्तीत जास्त मालाचा उठाव व्हावा, बेदाणा उत्पादकांना चांगला दर मिळावा, यासाठी गलाई बांधवांना बेदाणा खरेदीचे परवाने देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्याबाबत गलाई असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी झाली आहेत. येणाऱ्या काळात तासगावचा बेदाणा देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होईल, अशी विक्री व्यवस्था केली जाणार आहे.
- अविनाश पाटील, सभापती, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
गलाई व्यवसायाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक लोक काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत स्थिरावले आहेत. व्यवसायातील तीव्र स्पर्धा आणि अन्य कारणांमुळे धंदा मंदावला आहे. त्यामुळे राज्याबाहेर स्थायिक झालेले गलाई बांधव नवीन व्यावसायाचे मार्ग अवलंबत आहेत. तासगाव बाजार समितीचा प्रस्ताव आमच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
- शंकरनाना पवार, सचिव, नॅशनल गोल्ड, सिल्व्हर, ज्वेलरी असोसिएशन.