भुयारी गटारीच्या नावाखाली तासगाव शहरातील सगळे रस्ते पालिकेने उकरले आहेत. ऐन पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यांमुळे जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. शहरातील रस्त्यांची अशी परिस्थिती असताना मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या हट्ट धरणाऱ्या आणि त्यासाठी मारामारी करणाऱ्या नगरसेवकांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.
पाटील म्हणाले, नागरिकांच्या करातून मिळणारा पैसा घरचा पैसा असल्यासारखे भाजपचे नगरसेवक वागत आहेत. शिंपी गल्ली सोमवार पेठ भागात महिनाभर नागरिकांना रस्त्यावरून चालणे अशक्य असताना न फिरकणारे नगरसेवक मळ्याकडे मुरूम टाकून घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणून चक्क मारामारीपर्यंत जातात. भुयारी गटारीच्या कामाचा ठेकेदार व या कामाचा त्याचा भागीदार नगरसेवक या दोघांच्या घराच्या मधला कासार गल्लीतील रस्ता काँक्रीटचा होतो. शहरात इतर ठिकाणी मात्र मोठी खडी टाकून लोकांवर उपकार केल्यासारखे पालिकेने पाडलेल्या चरी बुजवल्या जात आहेत.
चौकट
खासदारांचे नियंत्रण सुटले
खासदारांचे पालिकेतील नियंत्रण सुटले आहे. तीन-चार महिन्यात पालिकेतील भाजपचे सदस्य एकमेकांत आर्थिक कारणावरून मारामाऱ्या करताना दिसत आहेत. त्यामुळे नेत्यांची आणि पक्षाची संस्कृती समोर आली आहे.