तासगावात भाजप, राष्ट्रवादीच्या कुस्तीला काँग्रेस, सेनेचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:08+5:302021-08-29T04:26:08+5:30
दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या सत्तेत भाजप आणि विरोधात राष्ट्रवादी आहे. या दोन्ही पक्षांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी शड्डू ...

तासगावात भाजप, राष्ट्रवादीच्या कुस्तीला काँग्रेस, सेनेचा खोडा
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या सत्तेत भाजप आणि विरोधात राष्ट्रवादी आहे. या दोन्ही पक्षांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी शड्डू मारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेनेही आखाड्यात उतरण्यासाठी जुळवाजुळव केल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कुस्तीला खोडा बसला आहे. तूर्तास नगरपालिकेची लढत दुरंगी होणार की तिरंगी, याबाबत नेमके चित्र स्पष्ट नसल्याने नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
तासगाव नगरपालिकेची २४ हजार ६५८ इतकी मतदारसंख्या आहे. दहा प्रभागांतून २१ नगरसवेक पालिकेत प्रतिनिधित्व करत आहेत. गतवेळी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. काँग्रेसने ऐन वेळी निवडणुकीत रंगत आणल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक भाजपचे तर राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक निवडून आले होते.
गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांचा कारभार गोेंधळ वाढविणारा होता. बेकायदेशीर कामांची रेलचेल, भ्रष्टाचाराचे आरोप, निरंकुश आणि अनियंत्रित कारभाराचा अनुभव नागरिकांना आला. खासदार संजयकाका पाटील यांनी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी मंजूर करून आणला खरा. मात्र, या निधीचा विनियोग जनतेच्या हितापेक्षा कारभाऱ्यांच्या हितासाठीच अधिक झाला. शहरात नगरपालिकेची व आरोग्य विभागाची इमारत अशी काही मोजकीच कामे झाली. सत्ताधाऱ्यांना मूळ समस्यांचे निराकरण करता आले नाही. किंबहुना, राष्ट्रवादीची पालिकेतील भूमिका केवळ बघ्याची राहिली. विरोधक म्हणून केवळ स्टंट करण्यापलीकडे राष्ट्रवादीला कोणताच अंकुश ठेवता आला नाही.
यावेळच्या निवडणुकीत एकसदस्यीय प्रभाग रचना होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढली आहे. यावेळीही भाजप आणि राष्ट्रवादी या पारंपरिक विरोधकांसोबतच काँग्रेस आणि शिवसेनेनेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
चौकट
तिरंगी लढतीची शक्यता
राज्यातील महाआघाडीचा पॅटर्न तासगावात राबविला जाईल, याबाबत साशंकता व्यक्त हेात आहे. त्यामुळे पालिका लढतीचे चित्र स्पष्ट नसले, तरी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी एकसदस्यीय प्रभाग रचना असल्याने, पालिकेत सत्तेत येण्यासाठी सर्वच पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.