तासगाव, वांद्रेचा फैसला आज
By Admin | Updated: April 15, 2015 00:31 IST2015-04-15T00:31:09+5:302015-04-15T00:31:09+5:30
पोटनिवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण; उत्सुकता शिगेला

तासगाव, वांद्रेचा फैसला आज
तासगाव/ मुंबई : तासगाव-कवठेमहांकाळ तसेच वांद्रे विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, बुधवारी होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या निकालाकडे मतदारसंघासह राज्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तासगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्यासह नऊ उमेदवारांचे, तर वांद्रे येथे नारायण राणे, तृप्ती सावंत यांच्यासह १० उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रातून स्पष्ट होणार आहे.
तासगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार असून, पहिल्या फेरीत उमेदवारांना पडलेली मते साधारण नऊपर्यंत स्पष्ट होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळची पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या काळात मतदारसंघात विशेष निवडणुकीचे असे वातावरण नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अन्य राजकीय पक्षांना या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले होते. त्याला सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिसाद देत पक्षाचा उमेदवार दिला नाही. मात्र आर. आर. पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या विरोधात आठ अपक्षांनी लढत दिली. पक्षीय पातळीवर ही निवडणूक होत नसल्यामुळे निवडणुकीत फारशी चुरस राहिली नव्हती. परंतु, अंदाज फोल ठरवत ५८.७४ टक्के मतदान झाले. दोन लाख ६४ हजार २०४ मतदारांपैकीएक लाख ५५ हजार १८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. त्यात तासगाव तालुक्यातून ६१.३२, तर कवठेमहांकाळ तालुक्यातून ५५.५० टक्के मतदान झाले.
आता साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बहुउद्देशीय सभागृहात होणाऱ्या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सुमारे १०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. १४ टेबलांवर मतदानयंत्रात बंदिस्त झालेली मते मोजण्यात येणार आहेत, तर एका टेबलावर पोस्टाची मते मोजली जाणार आहेत. १४ टेबलांवरील २१ फेऱ्या व पोस्टल मतदानाची एक फेरी अशा २२ फेऱ्यांमधून हा संपूर्ण निकाल स्पष्ट होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक निरीक्षक, एक पर्यवेक्षक, एक सहायक व एक शिपाई असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
१० कर्मचारी राखीव व अन्य ५० कर्मचारी, अशा १०० कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षणही मंगळवारी घेण्यात आले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपुढील मुख्य रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, जिल्हा पोलिसांचे विशेष पथक अशा २०० ते २५० पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. बुधवारी होणाऱ्या मतमोजणीचीच चर्चा सध्या मतदारसंघात आहे.
वांद्रेतील समाजमंदिरातील निवडणूक कार्यालयात सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. एकूण १९ फेऱ्या होणार असून, साडेअकरापर्यंत निकाल घोषित होण्याची शक्यता आहे़, तर तासगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.
मतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार असून, पहिल्या फेरीत उमेदवारांना पडलेली मते साधारण नऊपर्यंत स्पष्ट होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.