तासगावात विराट अंत्ययात्रा
By Admin | Updated: February 18, 2015 01:19 IST2015-02-18T01:19:06+5:302015-02-18T01:19:06+5:30
आबांना अखेरचा सलाम : जनसागराला अश्रू अनावर

तासगावात विराट अंत्ययात्रा
तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तासगावात जमलेल्या अथांग जनसागराला अश्रू अनावर झाले. आज (मंगळवारी) सकाळी त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा तासगाव शहरातून काढण्यात आली. कार्यकर्त्यांसह, हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात ही अंत्ययात्रा निघाली.
सोमवारी सायंकाळी आबांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर तासगाव तालुक्यावर शोककळा पसरली होती. मुंबईतून रात्री उशिरा निघालेले त्यांचे पार्थिव आज सकाळी पावणेआठ वाजता तासगावात पोहोचले. रात्रभर कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेची तयारी केली होती. शहरातील भिलवडी नाका परिरसरात सकाळी सहापासून कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. भिलवडी नाक्यावर फुलांच्या हारांनी सजविलेला ट्रक उभा करण्यात आला होता. आबांच्या पार्थिवाची वाट बघत कार्यकर्ते, नागरिक तेथे मोठ्या संख्येने उभे होते.
सकाळी पावणेआठ वाजता रुग्णवाहिकेतून आबांचे पार्थिव आल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला शोक अनावर झाला. ‘आर. आर. आबा अमर रहे, परत याऽ परत याऽऽ..’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. गर्दीमुळे सुरुवातीला बराच वेळ पार्थिव रुग्णवाहिकेतून बाहेर काढणे मुश्किल झाले होते.
सजविलेल्या ट्रकमध्ये पार्थिव ठेवल्यानंतर अखेरची यात्रा सुरू झाली. बघता-बघता तासगावातील रस्ते गर्दीने खचाखच भरले होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. महिलांनीही रस्त्यावर येऊन अखेरचा निरोप दिला. शहरातील प्रत्येक इमारतीच्या छतावर नागरिक उभे होते.
भिलवडी नाका, सिद्धेश्वर चौक, पोस्ट मार्गे गणपती मंदिर, गुरुवार पेठ, बसस्थानक चौक यामार्गे अंत्ययात्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोहोचली. बाजार समिती आवारातील आबांच्या कार्यालयात त्यांचे पार्थिव काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे नियोजनात असल्यामुळे नागरिकांनी आधीच तिथे मोठी गर्दी केली होती. गर्दी व वेळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिथे पार्थिव न ठेवण्याचा ऐनवेळी निर्णय घेण्यात आला. बाजार समिती आवारात महिलांनी, व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते. बाजार समितीमधून पार्थिव सावळजमार्गे अंजनीकडे रवाना झाले आणि तासगाव सुने-सुने झाले. (वार्ताहर)