जिल्ह्यात ४० हजार शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:23+5:302021-09-14T04:31:23+5:30
सांगली : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘स्थायित्व व सुजलाम् ...

जिल्ह्यात ४० हजार शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट
सांगली : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘स्थायित्व व सुजलाम् अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत जिल्ह्यात किमान ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगलीत सोमवारी दिली.
प्राजक्ता कोरे, जितेंद्र डुडी म्हणाले की, लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हगणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करता यावेत म्हणून ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे, याबाबींचा समावेश आहे. या अभियान कालावधीत जिल्ह्यात ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हगणदारीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक शोषखड्ड्यांचे बांधकाम पूर्ण करणे, यासाठी ग्रामपंचायतने ठराव मंजूर करावा. हगणदारीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्ड्यांचे बांधकाम करण्यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायतीने तयार करावयाचा आहे, तसेच नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाची निवड करण्यात येणार आहे.
चौकट
वित्त आयोगातून निधी खर्च
अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी अभियान कालावधीत जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. हगणदारीमुक्त शाश्वतता आणि शोषखड्ड्यांचे बांधकाम करण्यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन, पंधरावा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी दिली.