तानाजीराव मोरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:33+5:302021-06-30T04:17:33+5:30
सांगली : सामाजिक आणि पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी तानाजीराव मोरे (वय ८७) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने ...

तानाजीराव मोरे यांचे निधन
सांगली : सामाजिक आणि पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, सेवानिवृत्त वनसंरक्षक अधिकारी तानाजीराव मोरे (वय ८७) यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. सांगलीतील विविध संस्थांमध्ये सक्रिय असलेल्या मोरे यांनी अखेरपर्यंत सामाजिक बांधिलकी जपत कार्य केले.
वन विभागात नोकरी लागण्यापूर्वी मोरे गोटखिंडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. नव विभागातून ते वनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. सांगलीतील मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. संस्थेचे वधू-वर मेळावे आणि संगणक प्रशिक्षण केंद्र या दोन महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. एडसग्रस्तांचे पुनर्विवाह, विधवा-विधूर पुनर्विवाह आणि त्यांचे पुनर्वसन या कामातही त्यांनी मोठे योगदान दिले.
नवभारत शिक्षण मंडळाचे ते उपसंचालक होत. दिवंगत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. शालेय जीवनापासून ते शांतिनिकेतन परिवाराशी जोडले गेले होते. संस्थेचे उपसंचालक म्हणून अखेरपर्यंत त्यांनी निष्ठापूर्वक काम केले. ते उत्कृष्ट टेनिसपटू आणि कुस्तीचे शौकीन होते.
सांगली रोटरी क्लबचे अध्यक्ष असताना त्यांनी पर्यावरणाला पोषक असे अनेक उपक्रम राबवले. सेवानिवृत्तीनंतर ते पर्यावणाबाबत काम करणाऱ्या आभाळमाया, आमराई क्लब आणि इतर विविध संस्था, संघटना आणि चळवळींमध्ये सक्रिय सहभाग देत होते. सांगलीत त्यांनी सुरू केलेला वृक्षदिंडीचा कार्यक्रम आजही सुरू आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचे ते व्याही होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.