शेगावमधील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:05+5:302021-01-13T05:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र या रणधुमाळीत जत उत्तर भागातील ...

शेगावमधील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र या रणधुमाळीत जत उत्तर भागातील शेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. एकूण १३ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काट्याची दुरंगी लढत होणार आहे.
येथे काँग्रेस व भाजपमध्ये गेल्या पाच वर्षांत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसविरोधात भाजप-राष्ट्रवादी अशा दोन प्रमुख पॅनेलमध्ये चुरस आहे. शेगावमध्ये गावपातळीवर काँग्रेस व भाजपच्या गटाचेच प्राबल्य राहिले आहे. ग्रामपंचायतीवर दहा वर्षे माजी सरपंच व भाजपचे लक्ष्मण बोराडे यांच्या गटाची सत्ता होती. मात्र २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. सध्या गावातील शेगाव विकास संस्था भाजप गटाच्या ताब्यात आहे.
काँग्रेसप्रणित जय हनुमान ग्रामविकास पॅनेल व भाजप-राष्ट्रवादीप्रणित परिवर्तन ग्रामविकास आघाडी अशा दोन पॅनेलमध्ये जोरदार लढत होणार आहे. १३ जागांसाठी अपक्ष २ व दोन्ही पॅनेलचे २६ असे २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
भाजप व राष्ट्रवादीप्रणित परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व लक्ष्मण बोराडे, संभाजी पाटील, शहाजी बोराडे, सचिन बोराडे, वसंत शिंदे, दादा पाटील, राजेंद्र नाईक, वसंत काशीद आदी करीत आहेत, तर काँग्रेसप्रणित जय हनुमान पॅनेलचे नेतृत्व तानाजी बोराडे, रवींद्र पाटील, दत्ता निकम, धोंडीराम माने, महादेव साळुंखे, हरिश्चंद्र शिंदे, भारत शिंदे, दत्ता शिंदे आदींकडे आहे. सध्या सोशल मीडिया व ध्वनिक्षेपकावरून प्रचार जोरात सुरू आहे. येथे पाच प्रभाग असून ४५२८ मतदारांपैकी स्त्री मतदार २१३६ व पुरुष मतदार २३९२ आहेत.