तासगावात नगराध्यक्ष बदलाची चर्चाच
By Admin | Updated: March 23, 2016 00:46 IST2016-03-22T23:30:28+5:302016-03-23T00:46:47+5:30
संजयकाकांशी बोलणार कोण? : नगरसेवकांना होईना धाडस, विषय प्रलंबित

तासगावात नगराध्यक्ष बदलाची चर्चाच
तासगाव : तासगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा तीन महिन्यांचा नगराध्यक्षपदाचा कालावधी संपल्यानंतर, नगराध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग आला होता. नगराध्यक्ष बदलासाठी काही नगरसेवकांनी एकत्रित येत मोर्चेबांधणी केली. मात्र खासदार संजयकाकांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी कोणत्या नगरसेवकाने पुढाकार घ्यायचा? या भीतीने नगराध्यक्ष बदलाचा विषय खासदारांपर्यंत पोहोचला नाही.
त्यामुळे नगराध्यक्ष बदलाची केवळ चर्चाच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तासगाव पालिकेत संजयकाका गटाची सत्ता आल्यानंतर पहिल्या टप्प्यात सुशिला साळुंखे यांना दोन महिन्यांसाठी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांचा तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा नगराध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली.
नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. आठ नगरसेवकांनी एकत्रित बैठक घेऊन नगराध्यक्ष बदलासाठी खासदार संजयकाकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. संजयकाका दिल्लीहून आल्यानंतर सोमवारी तासगाव शहरातील सर्व प्रभागात विविध विकासकामांचे नारळ फुटले. यावेळी काका गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. मात्र दिवसभरात एकाही नगरसेवकाने नगराध्यक्ष बदलाबाबतची चर्चा खासदारांशी केली नाही. नेमकी चर्चा कोणी करायची? याबाबत नगरसेवकांत एकमत झाले नाही. चर्चा केली आणि त्याला संजयकाकांचा विरोध असला, तर रोषाचे धनी कोणी व्हायचे? असा प्रश्न उपस्थित करीत नगराध्यक्ष बदलासाठी आग्रही असलेल्या सर्वच नगरसेवकांनी मौन धारण केले.
त्यामुळे संजयकाका आल्यानंतर नगराध्यक्ष बदलाबाबत मागणी करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला असून, त्याची केवळ चर्चाच राहिली आहे. (वार्ताहर)
नगराध्यक्ष बदलाचा निर्णय लांबणीवर
खासदार संजय पाटील दिल्लीहून आल्यानंतर नगराध्यक्ष बदलाबाबत मागणी करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला असून, त्याची केवळ चर्चाच राहिली आहे. नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. आठ नगरसेवकांनी एकत्रित बैठक घेऊन नगराध्यक्ष बदलासाठी खासदार संजयकाकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांनी त्याबाबत कोणतीही मागणी केली नाही.