शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:47+5:302021-09-04T04:31:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अनेकवेळा विद्युत देयक थकबाकी किंवा अन्य कारणांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा ...

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो गुन्हा!
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अनेकवेळा विद्युत देयक थकबाकी किंवा अन्य कारणांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा जोडून घेतला जातो; मात्र नकळत घडणारा हा प्रकार अंगलट येऊ शकतो. शेजाऱ्याकडून वीजपुरवठा घेणाऱ्यांवर आणि तो देणाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते. घराला लागूनच दुकान आहे, तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल, तरीदेखील कारवाई होऊ शकते, अशी माहिती महावितरणकडून दिली आहे.
वीजचोरी आणि गळती कमी केल्याशिवाय ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करता येणार नाही. आधुनिक तंत्राचा वापर करूनही वीज गळती आणि चोरी सुरूच आहे. या चोरट्या विजेचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर भुर्दंड टाकला जात आहे. म्हणूनच महावितरण कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची माेहीम राबविली आहे.
चौकट
महावितरणकडून दोन वर्षांत झालेली कारवाई
वर्ष गुन्हे दाखल युनिट चोरी दंड
२०२०-२१ १०५ ८४,२२५ १३.१५ लाख
२०२१-२२ १८ १३,८०८ २.१७ लाख
चौकट
कायदा काय सांगतो?
विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीजपुरवठा घेणे, मंजूर वर्गवारीतून इतर वर्गवारीसाठी अनधिकृत वीज वापर केल्याप्रकरणी कारवाई केली जाऊ शकते. यासह मीटरशी छेडछाड, आकडा टाकून वीज वापर, सर्व्हिस वायर टॅप केल्यास कलम १३५ नुसार कारवाई केली जाते.
चौकट
चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा
-२००३ मध्ये तयार केलेल्या विद्युत कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाढत्या वीजचोरीला आळा घालण्याकरिता ‘वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा’, ही अभिनव योजनाही हाती घेण्यात आली आहे.
-याअंतर्गत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. एवढेच नव्हे, तर संबंधितास वीजचोराकडून वसूल करण्यात आलेल्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा.
कोट
नियमबाह्य विजेचा वापर हा कायद्याने गुन्हाच आहे. यामुळे महावितरणकडून पुरविली जाणारी वीज चोरट्या मार्गाने वापरणाऱ्यांची कुठलीच गय केली जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहावे. शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीज वापरणाऱ्यांवर आणि घरातील वीज दुकानासाठी वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.
-धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता, महावितरण सांगली.