इमारती ताब्यात घ्या, अन्यथा मंगळवारी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:56+5:302021-05-31T04:19:56+5:30
इस्लामपूर : शहरातील विजयभाऊ पाटील हेल्थ क्लब आणि जयंत पाटील एन. ए. कला-क्रीडा मंडळाकडील इमारती ताब्यात घेण्याचे ठराव ...

इमारती ताब्यात घ्या, अन्यथा मंगळवारी उपोषण
इस्लामपूर : शहरातील विजयभाऊ पाटील हेल्थ क्लब आणि जयंत पाटील एन. ए. कला-क्रीडा मंडळाकडील इमारती ताब्यात घेण्याचे ठराव मंजूर आहे. मात्र, तरीही मुख्याधिकाऱ्यांनी या इमारती ताब्यात घेतल्या नाहीत. पूर्वीच्या काळात बेकायदेशीर ठराव केल्याने नगरपालिकेसह शहराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ठरावाची अंमलबजावणी न केल्यास १ जूनपासून उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक वैभव पवार यांनी दिला आहे.
वैभव पवार यांनी निवेदनात म्हटले की, विजयभाऊ पाटील हेल्थ क्लब आणि जयंत पाटील एन. ए. कला-क्रीडा मंडळ या दोन्ही मंडळांना पालिकेच्या मालकीच्या इमारती नाममात्र भाडेतत्त्वावर देताना नगरपालिका अधिनियमातील कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे. २२ फेब्रुवारीच्या सभेत अंबिका उद्यान परिसरातील विजयभाऊ पाटील हेल्थ क्लबची इमारत ताब्यात घेण्याचा ठराव झाला. त्यानंतर २२ मार्चच्या सभेत निनाईनगर येथील जयंत पाटील एन. ए. मंडळाची इमारत ताब्यात घेण्याचा ठराव झाला. मात्र, पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करण्याचा आरोप पवार यांनी केला आहे.