कोरोना लस घ्या, अन्यथा दुकाने, व्यवसाय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:54+5:302021-09-16T04:32:54+5:30
सांगली : महापालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्व व्यावसायिक, खासगी आस्थापना, बांधकामावरील मजूर, कामगार, गॅरेज, खोकी, ...

कोरोना लस घ्या, अन्यथा दुकाने, व्यवसाय बंद
सांगली : महापालिका प्रशासनाने कोविड लसीकरणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्व व्यावसायिक, खासगी आस्थापना, बांधकामावरील मजूर, कामगार, गॅरेज, खोकी, हातगाडी चालकांना कोरोनाची लस तातडीने घेण्याची सूचना करण्यात आली आहे. लस न घेतलेल्या दुकाने, आस्थापना बंद करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. त्यासाठी गुरुवारपासून विशेष तपासणी मोहीमही हाती घेतली जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात १८ वर्षांवरील ४ लाख १० हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी २ लाख ४३ हजार नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. अजून एक लाख ६७ हजार नागरिकांनी लस घेतलेली नाही. बुधवारच्या महालसीकरण अभियानात ४० हजार नागरिकांनी लस घेतली. अजून सव्वा लाख लोकांचे लसीकरण शिल्लक आहे. काही जण लस घेण्यास अजूनही तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेने आता शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्त भूमिका घेतली आहे.
आयुक्त कापडणीस म्हणाले की, शहरातील हातगाडी, गॅरेज, खोकीधारक, व्यापारी व इतर खासगी आस्थापनांकडील कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी. खासगी व्यावसायिकांच्या संघटनांनाही कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याबाबत सूचना केल्या आहेत. बांधकाम क्षेत्रातील मजूर, कामगारांचेही लसीकरण झाले पाहिजे. शासनाकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या आस्थापनांकडील कर्मचारी, मालकांचे लसीकरण झाले नाही, त्या आस्थापना बंद करण्यात येतील.
चौकट
सहायक आयुक्तांवर जबाबदारी
शहरातील दुकाने, गॅरेज, खोकी, हातगाड्यांसह सर्वच आस्थापनांची गुरुवारपासून तपासणी केली जाणार आहे. सहायक आयुक्त, स्वच्छता निरीक्षकांकडून ही तपासणी होईल. लसीकरण न झालेल्या दुकाने बंद करण्याबाबत सहायक आयुक्तांना आदेश दिले आहेत.