गावात विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:37+5:302021-05-07T04:28:37+5:30
संख : गावात विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी. कोरोना रुग्णांचे विलगीकरण करण्याची जबाबदारी दक्षता समितीची आहे. रुग्णाच्या ...

गावात विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करा
संख : गावात विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी. कोरोना रुग्णांचे विलगीकरण करण्याची जबाबदारी दक्षता समितीची आहे. रुग्णाच्या घराजवळ पत्रा लावून परिसर सील करावा. संपर्कातील व्यक्तीना होम क्वाॅरण्टाइन करावे. ग्रामदक्षता समितीची दररोज बैठक व्हावी, असे आदेश प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले.
संख (ता.जत) येथे ग्रामदक्षता समिती, खासगी डॉक्टर यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी आवटे म्हणाले, संख येथील खासगी डॉक्टरांनी कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या तक्रार येत आहेत. खासगी डॉक्टरांनी तपासणी करण्यापूर्वी त्याचे आधार कार्ड, मोबाइल नंबर रजिस्टरमध्ये नोंद करावा. शासन आदेशानुसार कोरोना रुग्ण सोडून इतर रुग्णांवरही उपचार करावेत. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये पाठवावे. कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास जबाबदारी खासगी डॉक्टरची असणार आहे. त्या डॉक्टरांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करून गुन्हा दाखल केला जाईल.
यावेळी अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे, माजी सभापती आर.के. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल सावंत, मंडल अधिकारी एस.आर. कोळी, तलाठी राजेश चाचे, ग्रामसेवक के.डी. नरळे, सरपंच मंगल पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.