लंडनवासीय ताकारीच्या सुपुत्राने दिले २०.७० कोटींचे वैद्यकीय साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:48+5:302021-05-13T04:27:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : लंडनमध्ये स्थायिक झालेल्या ताकारी (ता. वाळवा) येथील डॉ. अरविंद शाह यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मुकुल-माधव ...

लंडनवासीय ताकारीच्या सुपुत्राने दिले २०.७० कोटींचे वैद्यकीय साहित्य
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : लंडनमध्ये स्थायिक झालेल्या ताकारी (ता. वाळवा) येथील डॉ. अरविंद शाह यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मुकुल-माधव फाउंडेशनमार्फत वीस कोटी सत्तर लाख रुपये (दोन मिलियन पाऊंड) किमतीची व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यंत्रे आणि इतर वैद्यकीय साहित्य मायदेशातील रुग्णांसाठी पाठविले आहे.
मूळचे ताकारी येथील डॉ. अरविंद शाह ब्रिटनमधील लंडन शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत. गेली चाळीस वर्षे ते तेथे स्थायिक आहेत. ताकारीतील प्रतिष्ठित व्यापारी रसिकलाल मणिलाल शाह यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून, मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक जिंकले होते.
मायदेशावरील कोरोनाचे संकट वाढले असताना डॉ. शाह यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी तब्बल वीस कोटी सत्तर लाख रुपये किमतीची व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यंत्रे आणि इतर वैद्यकीय साहित्य मायदेशातील रुग्णांसाठी पाठविले आहे. मुकुल माधव फाउंडेशनमार्फत त्यांनी ही मदत पोहोचवली आहे.
याबाबत गुजराती समाज महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र शहा म्हणाले की, डॉ. शाह यांच्या सामाजिक कार्याचा गुजराती समाज महासंघाला अभिमान असून, विविध देशांत वास्तव्य करीत असलेल्या समाजबांधवांनी या संकटसमयी देशासाठी योगदान द्यावे. अखिल भारतीत जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघातर्फे डॉ. शाह यांचा लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.