ताकारी-किर्लोस्करवाडी चाचणी एक्सप्रेस १२० च्या गतीने सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:17+5:302021-06-21T04:18:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाची चाचणी रविवारी यशस्वी झाली. चाचणीसाठीची एक्सप्रेस १२० ...

ताकारी-किर्लोस्करवाडी चाचणी एक्सप्रेस १२० च्या गतीने सुसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाची चाचणी रविवारी यशस्वी झाली. चाचणीसाठीची एक्सप्रेस १२० किलोमीटर प्रतितास या गतीने धावली. चाचणी यशस्वी झाली असून लवकरच नियमित प्रवासाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
सकाळी ९.३५ वाजता ताकारीमधून विद्युत इंजिनासह एक्सप्रेस सोडण्यात आली. अवघ्या ६ मिनिटांत म्हणजे ९.४१ वाजता ती किर्लोस्करवाडी स्थानकात पोहोचली. ग्रामस्थ व प्रवाशांनी तिचे स्वागत केले. चाचणीदरम्यान १२० किलोमीटर प्रतितास या गतीने धावली. सध्या डिझेल इंजिनाच्या अन्य सर्व एक्सप्रेस गाड्या मिरज ते पुणे मार्गावर कमाल ११० किलोमीटर प्रतितास या गतीने धावतात. विजेवरील गाडी मात्र १२० ने सोडण्यात आली.
केंद्रीय सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी स्वत: दहा डब्यांच्या एक्सप्रेसमधून चाचणी घेतली. गाडीला बसणारे हादरे, वळणावर सांभाळला जाणारा तोल, गाडी सुटल्यानंतर काही क्षणात मिळणारी गती, थांबताना बसणारे धक्के आदींचे निरीक्षण केले. यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्यासह वाणिज्य, अभियांत्रिकी, विद्युत, प्रशासन आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात होटगी ते दुधनी मार्गाची चाचणी सुरक्षा आयुक्तांनी शनिवारी घेतली. त्यानंतर रविवारी पहाटे मिरजेत आले. चाचणीसाठी दहा डब्यांची स्वतंत्र एक्सप्रेस आणली होती. तिला एका बाजूला विद्युत व दुसऱ्या बाजुला डिझेल इंजिन जोडले होेते. ताकारीपर्यंत डिझेल इंजिनाने एक्सप्रेस नेण्यात आली. तेथून विद्युत इंजिनाद्वारे परत किर्लोस्करवाडीला आणली. चाचणी झाल्यानंतर सुरक्षा आयुक्त पुण्याकडे रवाना झाले. पुढे शिंदवणे ते आळंदीदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाची चाचणी घेतली.
चौकट
प्रवासाला हिरवा कंदील लवकरच
मिरज ते शेणोलीदरम्यानचे अप मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुण्याहून मिरजेकडे डाऊन मार्गाचे टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यापैकी ताकारी ते किर्लोस्करवाडीदरम्यान पूर्ण झाले असून चाचणी यशस्वी झाली. त्याच्या अधिकृत घोषणेनंतर आयुक्तांकडून प्रवासाला परवानगी मिळणार आहे.