तबलावादनास श्रोत्यांची दाद
By Admin | Updated: March 30, 2015 00:16 IST2015-03-29T23:25:12+5:302015-03-30T00:16:07+5:30
शास्त्रीय गायनाने रंगत : मिरजकर व कवठेकर स्मृती संगीतसभा

तबलावादनास श्रोत्यांची दाद
मिरज : उमरसाहेब मिरजकर व उस्ताद गणपतराव कवठेकर स्मृती महोत्सव समितीतर्फे आयोजित संगीतसभेत पंडित आनंद बदामीकर (सोलापूर) यांचे बहारदार सोलो तबलावादन व अंकिता जोशी (मुंबई) यांचे शास्त्रीय गायन रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. तबल्याच्या विविध स्वरछटा व शास्त्रीय गायनास श्रोत्यांनी दाद दिली.
मिरजेतील मुक्तांगण सभागृहात आयोजित या संगीतसभेचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते उद्घाटन झाले. पंडित आनंद बदामीकर यांचा षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. पंडित बदामीकर यांनी त्रितालात तबलावादन केले. कायदा, रेला, तुकडा अशा तबल्याच्या विविध स्वरछटा व तबलावादनातील नजाकत त्यांनी सादर केली. उमेश पुरोहित यांच्या लेहरासाथीने तबलावादनास आणखी रंगत आली.
अंकिता जोशी यांनी राग शुध्द बराडी सादर केला. ‘सुधे बोलत नाही’ व ब्रीजभाषेतील बडा खयाल ‘कुंजबिहारी थारी रे’ या चीजा त्यांनी आळविल्या. नायकी कानडा या रागात ‘ए हो ग्यान रंगे’ ही चीज त्यांनी सादर केली. श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांचे शास्त्रीय गायन बहरले.
यावेळी कर्नल प्रकाश देवल, अॅड. अजित पुरोहित, विनायक गुरव, मधू पाटील, संभाजी भोसले, अर्चना दाते, यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब मिरजकर, कल्याण देशपांडे, मजीद सतारमेकर, मोहसीन सतारमेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)