तडसरला शेतमजुराचा धारदार शस्त्राने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:39+5:302021-06-03T04:19:39+5:30
तडसर (ता. कडेगाव) येथे वांगी रस्त्यालगतच्या शिवारात धनाजी भीमराव कोळी (वय ४५, रा.कुंडल, ता.पलूस) या शेतमजुराचा अज्ञात हल्लेखोराने ...

तडसरला शेतमजुराचा धारदार शस्त्राने खून
तडसर (ता. कडेगाव) येथे वांगी रस्त्यालगतच्या शिवारात धनाजी भीमराव कोळी (वय ४५, रा.कुंडल, ता.पलूस) या शेतमजुराचा अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने खून केला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत चिंचणी-वांगी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धनाजी भीमराव कोळी मूळचे जत येथील असून, मागील अनेक वर्षांपासून ते कुंडल येथे वास्तव्यास आहेत. मागील दोन महिन्यांपासून ते कुंडल येथील शेतकऱ्याच्या तडसरमधील शेतात शेतमजुरीसाठी येत होते. बुधवार, दि. २ जून रोजी दुपारी दीडच्या पूर्वी तडसर गावच्या हद्दीत माळीवस्ती कासार डीपीजवळच्या शिवारात उसाच्या पिकात धनाजी कोळी यांचा मृतदेह काही शेतमजुरांना आढळून आला.
कोळी यांच्या उजव्या कानाच्या मागे व कपाळावरील समोरील बाजूस धारदार शस्त्राने मारून खून केल्याचे दिसून आले. शेतमजुरांनी खुनाची माहिती चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यास कळविली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी उपाधीक्षक अंकुश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी तानाजी ज्ञानू कोळी (कोळी वस्ती, कुंडल) यांनी चिंचणी-वांगी पोलिसात फिर्याद दिली आहेे.