ताकारी योजनेच्या कालव्याला भेगा
By Admin | Updated: May 14, 2016 00:51 IST2016-05-14T00:49:35+5:302016-05-14T00:51:16+5:30
अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका : क्षमतेपेक्षा जादा पाणी भरल्याने धोका

ताकारी योजनेच्या कालव्याला भेगा
अतुल जाधव / देवराष्ट्रे
ताकारी उपसा योजनेच्या टप्पा क्र. ३ जवळ मुख्य कालव्याची दारे बंद केल्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक पाणी तुंबले गेले. त्यामुळे मुख्य कालव्याचा भराव भिंतीला चार ते पाच सेंटीमीटर रुंदीच्या भेगा पडल्या आहेत. या भेगा तीन ते चार ठिकाणी पडल्या असून त्यांची लांबी एक किलोमीटरवर आहे. यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. जेथे भेगा पडल्या आहेत, तेथील भरावाची उंची ३० ते ४० फूट असल्याने कधीही हा भराव ढासळण्याची शक्यता आहे.
ताकारी उपसा योजनेच्या टप्पा क्र. तीनजवळची मुख्य कालव्याची दारे पाणी चालू असताना एका अभियंत्याने बंद करायला लावली. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली. योजनेच्या आठही पंपांचे सर्व पाणी टप्पा क्र. ३ हौदात सोडले. या हौदाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे पाणी हौद भरून ओढ्या-ओघळीला जाऊ लागले. मात्र दारे खुली केली नाहीत. त्यामुळे पाणी वाढत गेले. ही पातळी टप्पा क्र. ३ पासून पाठीमागे दीड ते दोन किलोमीटरपर्यंत गेली. कालवा क्षमतेपेक्षा अधिक भरला. पाणी बाहेर पडू लागले. भराव, भिंती खचू लागल्या. नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी दक्षता म्हणून कालवा सुरू केला, तेव्हा दारे खुली करण्याचे आदेश देण्यात आले. तोपर्यंत मुख्य कालव्याच्या भरावाला चार ते सेंटीमीटर रुंदीच्या भेगा पडल्या होत्या. अशा भेगा तीन ते चार ठिकाणी पडल्या असून याची लांबी एक किलोमीटरवर अधिक आहे. या कालव्याचा भराव खचण्याचा किंवा फुटण्याचा धोका लक्षात घेऊन रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक पाटबंधारे विभागाने थांबवली आहे. दक्ष नागरिक व कर्मचारी यांच्या जागरुकपणामुळे धोका तात्पुरता तरी टळला आहे.
मुख्य कालव्याच्या भराव भिंतीला पडलेल्या भेगा धोकादायक आहेत. या भरावावरून जड वाहन गेले तर हा भराव खचू अथवा ढासळू शकतो. यामुळे कालवा फुटून पाणी इतरत्र पसरू शकते. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ताकारी योजनेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम न केल्यास मुख्य कालव्याला धोका निर्माण होऊ शकतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या वांगी सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की, याबाबत आम्ही वरिष्ठांशी चर्चा केली असून याबाबत लवकरच निर्णय होईल.