सांगलीत ‘स्वाइन’चे तीन बळी?
By Admin | Updated: September 27, 2015 00:45 IST2015-09-27T00:42:19+5:302015-09-27T00:45:39+5:30
मृतांत दोन महिला : एकाच दिवशी तिघांच्या मृत्यूने भीतीचे वातावरण

सांगलीत ‘स्वाइन’चे तीन बळी?
सांगली : ‘स्वाइन फ्लू’ संशयित आणखी तीन रुग्णांचा शनिवारी मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. एका दिवसात तिघांचा बळी गेल्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयात डॉक्टरांसह रुग्णांचे नातेवाईक आता तोंडाला मास्क लावून फिरू लागले आहेत.
सुजाता अशोक जोशी (वय ४८, रा. सीतारामनगर, सांगली), निर्मला अशोक पाटील (५०, पद्मावती कॉलनी, धामणी रस्ता, सांगली) व प्रतापसिंह बाळासाहेब पाटील (२९, वारणाली, विश्रामबाग) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांना गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र, त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे सुजाता जोशी व निर्मला पाटील यांना शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते; पण तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.
प्रतापसिंह पाटील यांना शनिवारी दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू केल्यानंतर दोन तासांतच त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांच्याही रक्ताचे नमुने घेऊन तपासणीला पाठविण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरात स्वाइन संशयित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन रुग्णांच्या तपासणीच्या अहवालात त्यांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. हे रुग्ण दानोळी (ता. शिरोळ) व वायफळे (ता. तासगाव) येथील होते. सध्या रुग्णालयात स्वाइनची लागण झालेले तीन रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वर्षभरात १८ बळी
गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूचे ६८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ रुग्णांचा बळी गेला आहे. उर्वरित ५० रुग्ण उपचार होऊन बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. महिन्यापासून स्वाइन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कडक ऊन असतानाही या आजाराचा झपाट्याने फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.