उपनगरांत कुत्र्यांच्या झुंडी, प्रवाशांची उडते घाबरगुंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:39+5:302021-09-15T04:30:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरासह उपनगरांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गल्ली-बोळासह मुख्य रस्त्यांवरही रात्रीच्यासुमारास कुत्र्यांच्या झुंडी फिरत ...

उपनगरांत कुत्र्यांच्या झुंडी, प्रवाशांची उडते घाबरगुंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरासह उपनगरांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गल्ली-बोळासह मुख्य रस्त्यांवरही रात्रीच्यासुमारास कुत्र्यांच्या झुंडी फिरत असतात. कुत्र्यांच्या टोळक्याकडून वाहनांचा पाठलागही केला जात आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अद्यापही महापालिकेला यश आलेले नाही.
शहरातील सर्वच प्रमुख चौकात रात्रीच्यावेळी मोकाट कुत्र्यांच्या झुंडी उभ्या असतात. पालिकेकडून मोकाट कुत्र्यांची नसबंदी सध्या बंद आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांनाही होत आहे. कुत्र्यांमुळे किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
चौकट
या चौकात जरा सांभाळून
शहरातील राजवाडा चौक, राममंदिर काॅर्नर, विजयनगर, काॅलेज काॅर्नर, काँग्रेस कमिटी, पटेल चौक, कर्नाळ पोलीस चौकी, गावभाग, हरिपूर रोड, वारणाली, टिंबर एरिया, शिंदे मळा या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या चौकातून रात्रीच्यावेळी जाताना वाहनचालकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
चौकट
आम्हाला चोराची नाही, कुत्र्यांची भीती वाटते
१. विजयनगर ते होळकर चौकापर्यंत रेल्वे पुलाजवळ मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर जाताना भीती वाटते. कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा - सुरेश सरगर
२. शिवाजी क्रीडांगणाच्या पूर्व बाजूला मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर आहे. या रस्त्यावर जाताना कुत्री वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे किरकोळ अपघातही होत आहेत. - कविता पाटील
चौकट
नसबंदी रखडली
१. महापालिकेकडून वर्षभरापूर्वी कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका देण्यात आला होता. त्याची मुदत संपताच नसबंदीचे काम रखडले
२. कित्येक वर्षांपासून महापालिकेकडे पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त होते. दोन महिन्यांपूर्वी या पदावर नियुक्ती करण्यात आली.
३. त्यानंतर नसबंदीचे काम सुरू झाले; पण त्याला आक्षेप आल्याने पुन्हा हे काम थांबले आहे.
चौकट
११७३ अँटिरेबीज आठ महिन्यांत
जानेवारी महिन्यापासून ऑगस्टअखेर ११७३ नागरिकांना अँटिरेबीज लस देण्यात आली. ही आकडेवारी केवळ सांगली शहरातील आहे. मिरज व कुपवाडमध्येही मोकाट कुत्र्यांचा मोठा त्रास आहे.
चौकट
कुत्रे आवरा हो
महिना श्वानदंश
जानेवारी : १७३
फेब्रुवारी : १३१
मार्च : १५९
एप्रिल : १४४
मे : १३५
जून १४७
जुलै : १६०
ऑगस्ट १२४