स्वराज्य फौंडेशन माणुसकीचा गहिवर, मदतीचा निर्झर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:35+5:302021-05-31T04:20:35+5:30
प्रादुर्भावामुळे माणसांची जगण्याची लढाई मरणाविरुद्ध लढण्याची लढाई होते की काय, इतके रौद्ररूप कोरोनाने तासगाव परिसरात धारण केले. शासकीय पातळीवर ...

स्वराज्य फौंडेशन माणुसकीचा गहिवर, मदतीचा निर्झर
प्रादुर्भावामुळे माणसांची जगण्याची लढाई मरणाविरुद्ध लढण्याची लढाई होते की काय, इतके
रौद्ररूप कोरोनाने तासगाव परिसरात धारण केले. शासकीय पातळीवर व राजकीय नेतेमंडळींनी
परस्परांना सहकार्य देत सरकारी ग्रामीण रुग्णालय, महिला तंत्रनिकेतन, आय. टी. आय. केंद्र, महिला
वसतिगृह येथे कोविड सेंटरची सर्व सुविधांसह उभारणी करण्यात आली.
कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांची पुरती पंचायत झाली. पोटाचा प्रश्न निर्माण
झाला. डोक्यात तणाव, पोटात भूक या अवस्थेतील एक नातेवाईक कोठे खाऊ सापडतो का? याचा शोध
घेत निराश होत असतानाच स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष किरण माने यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी
मित्राला बोलावून त्यांच्या नाष्ट्याची त्वरित व्यवस्था केली. १ मे २०२१ पासून स्वराज्य फौंडेशनच्या वतीने नातेवाइकांसाठी सर्व कोरोना सेंटरवर जेवणाच्या डब्याची व्यवस्था केली. त्यांची धडपड व माणुसकी पाहून समाजातील अनेक दातृत्वशील व्यक्तींनी त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. आज एक महिना झाला, स्वराज्य फौंडेशनच्या वतीने सर्व कोविड सेंटरमधील नातेवाइकांना सकाळ-संध्याकाळी रोज ३५ डबे पोहोच केले जात आहेत.
रुग्णांच्या नातेवाइकांना समाजातील दातृत्वाचा अनोखा अनुभव स्वराज्य फौंडेशनने दिला आहे.
‘माणुसकीचा गहिवर, मदतीचा निर्झर म्हणजे स्वराज्य फौंडेशन’ अशा बोलक्या प्रतिक्रिया लोकांतून
येत आहेत. स्वराज्य फौंडेशनचे अध्यक्ष किरण माने व ॲड. अमित शिंदे स्वतः लक्ष घालून क्लबमधील सर्वांच्या सहकार्याने सेवाभावी वृत्तीने हे काम करीत आहेत.