सांगलीत कॉँगे्रसच्या बैठकीत स्वबळाचा नारा
By Admin | Updated: April 15, 2015 00:29 IST2015-04-15T00:29:59+5:302015-04-15T00:29:59+5:30
जिल्हा बॅँक निवडणूक : मदन पाटील, मोहनराव कदम यांना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार

सांगलीत कॉँगे्रसच्या बैठकीत स्वबळाचा नारा
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी कोणतीही तडजोड न करता स्वबळावर कॉँग्रेसने लढावे, अशी मागणी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत केली. निवडणुकीबाबतचे धोरण आणि उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार माजी मंत्री मदन पाटील आणि मोहनराव कदम यांना देण्यात आले. २२ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत कॉँग्रेस निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय घेणार असून, उमेदवारही निश्चित केले जाणार आहेत.
बैठकीस कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, मदन पाटील, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, सत्यजित देशमुख, नामदेवराव मोहिते तसेच सर्व तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. पदाधिकारी तसेच तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याची भूमिका मांडली. एकजुटीने काम केले तर कॉँग्रेसचे बहुमत होऊ शकते. त्यामुळे निर्णय प्रक्रियेतील पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर ही निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली. काहींनी आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याचा निर्णय नेत्यांनीच घेतलेला बरा, असे मत मांडले.
आ. विलासराव जगताप यांनी केलेल्या आरोपाबाबतही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यावेळी मोहनराव कदम म्हणाले की, त्या माणसाची दखलसुद्धा घेण्याची गरज नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या आरोपांकडे फारसे लक्ष देऊ नये. बहुतांशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचाच नारा यावेळी दिला. दीड तास चाललेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. येत्या २२ एप्रिल रोजी कॉँग्रेसची पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत स्वबळावर लढायचे की आघाडी करून लढायचे, याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येकाचे मत आजमावून घेतल्यानंतर सर्वच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मोहनराव व मदन पाटील यांना निर्णयाचे अधिकार दिले. दोन्ही नेत्यांनी मिळून आपसात चर्चा करून जिल्हा बॅँक निवडणुकीविषयीचे धोरण ठरवावे. त्यांनीच उमेदवार निश्चित करावेत. त्यांच्या निर्णयाशी सर्व तालुक्यातील पदाधिकारी बांधिल राहतील, असे सांगितले. सर्वच पक्षात सुरू असलेल्या हालचालींचा अंदाज घेऊन २२ रोजी निर्णय घेतला जाईल, असे कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)