‘एफआरपी’ दरासाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या
By Admin | Updated: May 22, 2015 00:10 IST2015-05-21T23:28:32+5:302015-05-22T00:10:41+5:30
इस्लामपूर तहसीलसमोर आंदोलन : शासन, कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी

‘एफआरपी’ दरासाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या
इस्लामपूर/शिराळा : ऊस उत्पादकांना मार्च, एप्रिलमध्ये गाळप झालेल्या उसाचे बिल न देणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी बारा साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २०४ कोटी रूपये शेतकऱ्यांचे थकित आहेत. या कारखान्यांनी गळीत हंगाम बंद झाल्यानंतरही बिल न दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी बिल मिळविण्यासाठी कारखाना प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत. यामुळे एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांना सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी इस्लामपूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने कार्यालय परिसर दणाणून गेला होता. उसाची आधारभूत किंमत द्या, दूध दरात वाढ करावी यासह भूमी अधिग्रहण कायद्याबाबत शेतकरी हिताचे निर्णय करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुपारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भास्कर कदम, अॅड. एस. यु. संदे, भागवत जाधव, जयवंत पाटील, शहाजी पाटील, शिवाजीराव देसाई, गुंडाभाऊ आवटी, बाबासाहेब लादे, तानाजी साठे, बजरंग भोसले उपस्थित होते. (वार्ताहर)
मिरजेत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
मिरज : उसाला हमीभाव व भूमी अधिग्रहण कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मिरजेत तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा, दूध दरात वाढ करावी, बँक, सोसायटीत घोटाळे करणाऱ्या आरोपींवर कठोर करवाई करावी, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा आदी मागण्या करीत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संभाजी मेंढे, बी. आर. पाटील, महावीर पाटील, संजीव खोलकुंबे, सुरेश माळी, आदिनाथ मोळे, प्रकाश सटाले, जयपाल चौगुले यांच्यासह शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी तहसीलदार किशोर घाडगे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
शिराळ्यात निषेध
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करून शासन व साखर कारखानदारांचा निषेध व्यक्त केला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाने एफआरपीनुसार दर देत असतील तर सांगली जिल्ह्यातील का देत नाहीत, असा सवाल जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी उपस्थित केला. यावेळी राम पाटील, महादेव दिवे, बंडा नांगरे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.