पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:37+5:302021-08-17T04:32:37+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा मोर्चा
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रांतील पिके पाण्याखाली गेल्याने तेथील शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होऊन कर्जबाजारी झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून विश्वासघात केला आहे. सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्टला ‘स्वाभिमानी’च्यावतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्य प्रवक्ते अॅड. एस. यु. संदे यांनी सांगितले.
शासनाने महापुरानंतर नुकसान झालेल्या जिरायत पिकाला ६८ रुपये, तर बारमाही बागायती पिकांना १३२ रुपये प्रतिगुंठा नुकसानभरपाई जाहीर करून पूूरग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २४ ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे सोयीचे पुर्नवसन करावे. कृष्णा, वारणा नदीवर कमानी पूल बांधावेत, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि कर्ज माफ व्हावे. वीज बिलातील अवास्तव व्याज रद्द करावे, शेतकऱ्यांचे ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने मिळावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे.
यावेळी झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा, संजय बेले, जगन्नाथ मोरे, राम पाटील, बाळासाहेब जाधव, राजू माने, बाबा सांद्रे, आप्पासाहेब पाटील, शिवाजी मोरे, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, रमेश पाटील, विक्रांत कबुरे उपस्थित होते.