ऊसदरासाठी स्वाभिमानीने शासनावर दबाव आणावा
By Admin | Updated: October 15, 2015 00:34 IST2015-10-14T23:24:11+5:302015-10-15T00:34:05+5:30
पतंगराव कदम : घटक पक्षाचा पाठपुरावा हवा

ऊसदरासाठी स्वाभिमानीने शासनावर दबाव आणावा
सांगली : एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. सध्यस्थितीत कारखान्यांना शासनाने कमी पडणाऱ्या रकमेसाठी मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैशाचा हा फरक दूर करून एफआरपीसाठी शासनावर दबाव आणला पाहिजे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कदम म्हणाले की, केंद्र व राज्याने अजून एफआरपीसाठी मदत करणे आवश्यक आहे. मराठवाड्यात ज्यावेळी उसाचे अतिरिक्त उत्पादन झाले होते आणि ऊस शिल्लक राहिला होता, त्यावेळी आमच्या सरकारने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत केली होती. आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे एफआरपी दिलीच पाहिजे. प्रत्यक्षात आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयत्न केले पाहिजेत. घटक पक्ष असल्याने त्यांनी या गोष्टी कराव्यात. सरकारवर याप्रश्नी दबाव त्यांनी टाकावा. त्यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न सुटू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा भाषण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांना आशा आहेत. त्यांनी तातडीने निर्णय घेऊन एफआरपी व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा निकाली काढावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
एफआरपी आवश्यक
अतिरिक्त उत्पादनावेळी आमच्या सरकारने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत केली होती. आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे आता एफआरपी दिलीच पाहिजे, असे कदम म्हणाले.