‘स्वाभिमानी’ नेत्यांना शेतकऱ्यांऐवजी राजकारणातच रस : जयंत पाटील
By Admin | Updated: September 25, 2014 23:27 IST2014-09-25T22:40:04+5:302014-09-25T23:27:46+5:30
प्रचाराचा प्रारंभ : मानसिंगराव नाईक यांचा अर्ज दाखल

‘स्वाभिमानी’ नेत्यांना शेतकऱ्यांऐवजी राजकारणातच रस : जयंत पाटील
शिराळा : आमदार मानसिंगराव नाईक यांनी उसाला प्रति टन २६५0 असा उच्चांकी दर दिला. त्यामुळे येथील विरोधकांना शेतकरी आंदोलनाचा उपयोग होणार नसल्याचे लक्षात येताच ते भाजपात गेले आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना शेतकरी—सामान्यांचे सोयरसुतक नाही. त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केली.
शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आ. नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेवेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, महायुतीच्या आघाडीची बिघाडी झाली आहे. हे राज्य सांभाळणे येड्यागबाळ्याचे काम नाही. खंबीर नेतृत्व, धमक असली पाहिजे, ती राष्ट्रवादीकडे आहे.
यावेळी डॉ. प्रतापराव पाटील, सुनीता माने, सुधीर मोरे, संभाजी पाटील, डॉ. धनंजय माने यांची भाषणे झाली. सभेस अध्यक्ष पी. आर. पाटील, सभापती रवींद्र बर्डे, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, अॅड. भगतसिंग नाईक, रणजितसिंह नाईक, डॉ. उषाताई दसवंत, शंकरराव चरापले, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक, सतीश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)