‘स्वाभिमानी’त नाराजीचा फड!

By Admin | Updated: October 29, 2014 00:08 IST2014-10-28T23:03:23+5:302014-10-29T00:08:23+5:30

फुटीची चिन्हे : ऊस उत्पादकांच्या मुळावर

'Swabhimani' angry pad! | ‘स्वाभिमानी’त नाराजीचा फड!

‘स्वाभिमानी’त नाराजीचा फड!

अशोक डोंबाळे - सांगली -स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याऐवजी वाऱ्यावर सोडले, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटत आहेत. संघटनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी तेथे उसन्या उमेदवारांना आर्थिक निकषावर संधी देण्यात आल्याने सध्या संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असून, ही बाब ऊस उत्पादकांच्या मुळावर घाव घालणारीच आहे. संघटनेत फूट पाडण्याच्या खेळीत साखरसम्राट काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत.
बहुतांश पक्षांतील नेतेमंडळी निवडणुकांवेळी मुलाखतीला येणाऱ्या इच्छुकांकडे, ‘पैशाची काय तरतूद?’, अशी विचारणा करतच असतात. परंतु अशी विचारणा चळवळीतून नेते म्हणून नावारूपाला आलेल्यांकडूनही झाली, असा आरोप आता होत आहे. शेट्टींच्या जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शेतकरी, कष्टकऱ्यांच्या बळावरच आणि त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीतूनच झाल्या आहेत. त्या धर्तीवर कार्यकर्तेही विजयी होतील, असे नेत्यांना का वाटले नाही, अशी कार्यकर्त्यांतून चर्चा सुरू झाली आहे. स्वाभिमानीच्या इच्छुक कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून उसन्या उमेदवारांना पाच ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. याशिवाय, सांगली जिल्ह्यातील हक्काचे मतदारसंघही मित्रपक्षांना सोडण्यात आले. यामुळे येथील संघटनेचे बळ विरोधकांना मिळाले.
निवडणुकीतील संघटनेच्या नेत्यांनी केलेल्या या खेळीतून दुखावलेल्या काही कार्यकर्त्यांनी संघटनेला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी संघटनेत सहभाग न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवरून संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे, हे निश्चित.
इस्लामपूर मतदारसंघातून बी. जी. पाटील लढवय्ये कार्यकर्ते असून, त्यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु, पाटील यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने त्यांना उमेदवारी नाकारल्याचे सांगितले जाते. पाटील यांची बाजू कमकुवत होती, तर सदाभाऊ खोत यांना मैदानात का उतरवले नाही? काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना कशासाठी निवडणूक मैदानात उतरवण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
पलूस-कडेगावमधून संदीप राजोबा इच्छुक होते, पण त्यांनाही उमेदवारी नाकारून ही जागा भाजपला सोडण्यात आली. तासगाव-कवठेमहांकाळमधून महेश खराडे इच्छुक होते. ती जागाही भाजपला गेली. यामुळे खराडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली.
पंढरपूर मतदारसंघातून सोलापूर जिल्हाध्यक्ष जयंत बगाटे इच्छुक होते. परंतु, तेथे साखरसम्राट प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली. येथील नाराज कार्यकर्त्यांनी भारत भालके यांना सहकार्य केले. करमाळ्यातही साखर कारखानदार संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. कऱ्हाड उत्तरमधून संघटनेचे पंजाबराव पाटील इच्छुक होते. ऊसदराच्या आंदोलनात त्यांनी तुरूंगवासही भोगला. परंतु, संघटनेने ही जागा भाजपला सोडली आणि कऱ्हाड दक्षिणची जागा घेतली. येथून उद्योजक मनोज घोरपडे यांना उमेदवारी दिली. फलटणमधून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य पोपटराव काकडे यांना, तर शाहुवाडीतून काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अमरसिंह पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविले. संघटनेच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षाप्रमाणेच भूमिका घेऊन उमेदवारीच्या खिरापती वाटल्या. यातूनच संघटनेत धुसफूस सुरु आहे. संघटनेत फूट पाडण्यात साखरसम्राट यशस्वी ठरले असून, याचा फटका ऊस उत्पादकांना बसण्याची चिन्हे आहेत.

डिवचाल तर खासदारकीही...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा खांद्यावर घेऊन जिवाचे रान करणारा लढवय्या कार्यकर्ता, अशी उल्हास पाटील यांची ओळख होती. पण, आर्थिक निकष नेत्यांनी लावला आणि शिरोळ (जि. कोल्हापूर) विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी नाकारली. शेवटी लढवय्या तो लढवय्याच. उल्हास पाटील यांनी शिवसेनेकडून संघटनेच्या उमेदवाराच्याविरोधात आवाज उठविला आणि विजयही खेचून आणला. याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा फलक शिरोळमध्ये लागला असून, त्यावर ‘आता केवळ आमदारकी, डिवचाल तर खासदारकीही’ असा इशारा राजू शेट्टी यांना दिला आहे.
यंदा दोन ऊस परिषदा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद जयसिंगपूर येथे दि. १ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र संघटनेतून बाहेर पडून शिवसेनेचे आमदार झालेले उल्हास पाटील यांनीही सवतासुभा मांडत दि. १६ नोव्हेंबरला ऊस परिषदेचे नियोजन सुरु केले आहे. त्यांना सांगली जिल्ह्यातील नाराज गटाचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: 'Swabhimani' angry pad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.