राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा
By Admin | Updated: September 22, 2014 00:55 IST2014-09-22T00:51:28+5:302014-09-22T00:55:11+5:30
बैठकीत मागणी : जागा वाटपानंतरच भूमिका जाहीर करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा
सांगली : राज्यात काय व्हायचे ते होऊदे, परंतु सांगलीत राष्ट्रवादीने स्वबळावर लढून कॉँग्रेसला त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर माजी आमदार दिनकर पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करण्यात येईल; परंतु राज्यातील जागा वाटप झाल्यानंतरच आमची भूमिका जाहीर करू, असे स्पष्ट केले.
माजी मंत्री मदन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देतानाच दिनकर पाटील, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मदन पाटील यांच्याविरोधात मोहीम पुकारली आहे. त्यांच्यावर थेट टीका करताना सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणीही केली होती. सांगलीत नेमकी काय भूमिका घ्यावी, याचा कानोसा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक आज राष्ट्रवादी कार्यालयात बोलाविण्यात आली होती. बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी ‘स्वबळाचा’ नारा दिला. राज्यात आघाडी झाली आणि विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे मदन पाटील यांचे नाव जाहीर झाले तरीही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मदत करणार नसल्याची ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
सुरेश पाटील म्हणाले, राज्यात एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असताना येथील काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र आम्हाला राष्ट्रवादीची मदत नको असल्याचे जाहीर केले आहे. परंतु सांगलीकर मात्र सातत्याने काँग्रेसच्याच विरोधात असल्याचे लक्षात येईल. यंदा सांगलीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळालीच पाहिजे. ज्या दादा घराण्याची २७ वर्षे सेवा केली, त्यांनाच आज आम्ही संधिसाधू वाटत आहोत. त्यामुळे आता स्वत:च्या ताकदीवर लढण्याची वेळ आली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, मनपा क्षेत्रात राष्ट्रवादीचे सोळा नगरसेवक आहेत, तर चार ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत. काँग्रेसने आम्हाला कमी लेखू नये.
दिनकर पाटील म्हणाले, वसंतदादांच्या नावाने असलेल्या संस्था मोडून खाणाऱ्यांकडूनच सध्या दादांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागण्याचे कार्य सुरू आहे. परंतु सांगलीची जनता शहाणी आहे. भावनिक आवाहने केली म्हणजे मते मिळतील, या भ्रमात कोणी राहू नये. बॅँक कोणामुळे बुडाली त्यांची नावे जाहीर करण्यास इतका उशीर का होत आहे? सहकार मंत्र्यांनी बॅँकेच्या चौकशीस स्थगिती दिल्याने बेड्या पडलेल्या नाहीत. स्थगिती उठविल्यास सत्य बाहेर येईल. मदन पाटील यांच्या भोवताली असलेली सध्या जी चौकडी आहे, ती स्वत:चा स्वार्थ साधणारी आहे. स्वबळावर लढण्याची भूमिका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कानावर घातली जाईल. समजा आघाडी झाली आणि जागावाटपात कॉँग्रेसला ही जागा दिली गेली तर त्यानंतर आमची भूमिका जाहीर करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)