निलंबनावरून ‘स्थायी’त गदारोळ
By Admin | Updated: January 2, 2015 00:06 IST2015-01-01T23:01:12+5:302015-01-02T00:06:50+5:30
मेहेरनजर : सहाजणांचे निलंबन मागे; वरिष्ठांवरच ठपका

निलंबनावरून ‘स्थायी’त गदारोळ
सांगली : महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळेंसह सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून आज स्थायी समितीत गदारोळ झाला. स्थायीने या सहा कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेत त्यांच्यावर मेहेरनजर दाखविली. स्थायी सभापतींना न्यायाधीशांचा दर्जा असल्याने त्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आयुक्तांवर जोरदार टीकाही करण्यात आली. याबाबत उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही मौन पाळल्याने त्यांनाही लक्ष्य केले.
बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यावरून दोन महिन्यांपूर्वी बराच गदारोळ उडाला होता. या प्रकरणात आयुक्त अजिज कारचे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व स्वच्छता कर्मचारी गोविंद मद्रासी या दोघांना निलंबित केले. कॉलेज कॉर्नर येथे रस्ता खुदाई प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून बांधकाम विभागाकडील डी. डी. पवार यांच्यावर कारवाई झाली होती. तसेच पाणीपुरवठा विभागातील आणखी दोन कर्मचाऱ्यांनाही विविध कारणांवरून निलंबित करण्यात आले होते. डी. डी. पवार व अन्य तिघांनी आॅगस्ट महिन्यात या कारावाईविरोधात स्थायी समितीकडे अपील केले होते. त्यावर स्थायीने त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना कामावर घेण्याचे आदेश दिले. पण या आदेशाची अंमलबजावणी न करता आयुक्त कारचे यांनी चौकशी समिती नियुक्तीचा शेरा मारला होता.
त्यावर सभेत वादळी चर्चा झाली. अपिलाच्या प्रकरणात सभापतींना न्यायाधीशांचा दर्जा असतो. त्यांच्या निकालावर पुन्हा शेरा मारण्याचा आयुक्तांना अधिकार आहे का? असा सवाल सुरेश आवटी व अन्य सदस्यांनी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांना केला. पण ते समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. आयुक्तांचा बचाव करीत असाल, तर तुम्हाला पीठासनावर बसण्याचा अधिकार नाही, असा टोलाही सदस्यांनी लगाविला.
डॉ. आंबोळेंच्या प्रकरणातही पालिका कर्मचाऱ्यांनाच दोषी ठरविण्यात आले. वास्तविक मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलीस व रुग्णालय प्रशासनाची आहे. या दोन्ही प्रशासनाने त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही. उलट पालिकेने मात्र दोघांवर कारवाई केली. (प्रतिनिधी)
सांगली शहर एलईडीने उजळणार
शहरातील मुख्य बाजारपेठेसह काही चौक एलईडी दिव्याने उजळणार आहेत. त्याला आज स्थायीने मंजुरी दिली. शहरातील टिळक चौक ते महापालिका मुख्यालय, कापडपेठ, मेनरोड ते गणपती मंदिर, स्टेशन चौक आणि पंचमुखी मारुती रस्ता या परिसरात एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्याचबरोबरच शहरातील गटारी, रस्ते व बगीचा या साडेपाच कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली.