‘टाळे ठोक आंदोलन’ आश्वासनानंतर स्थगित
By Admin | Updated: November 11, 2014 00:06 IST2014-11-10T21:43:54+5:302014-11-11T00:06:44+5:30
शिराळा रुग्णालय : लवकरच डॉक्टरांची नियुक्ती

‘टाळे ठोक आंदोलन’ आश्वासनानंतर स्थगित
शिराळा : शिराळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, यासाठी मनसेमार्फत रुग्णालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले होते. आठ दिवसांत शिराळा व कोकरुड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देतो, असे आश्वासन आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे यांनी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. कोळी यांना भ्रमणध्वनीवरून दिल्याने मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी आठ दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित केले आहे. आठ दिवसांत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न केल्यास तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी दिला.
शिराळा ग्रामीण रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना दोनच अधिकारी आहेत. कोकरुड ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच अधिकारी आहे. सुरळीत आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे मनसेमार्फत रुग्णालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास रावळ यांनी या आंदोलनाबाबत वरिष्ठांशी संपर्क केला असता, आठ दिवसात येथे अधिकाऱ्याची नेमणूक करू, असे आश्वासन दिल्यावर, तात्पुरते हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंदराव कांबळे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सौ. एस. ए. इनामदार आल्या. यावेळी सावंत यांनी, तालुक्यातील सर्वच रुग्णालयातील अधिकारी नेमलेल्या ठिकाणी रहात नाहीत. रुग्णालयात सोयी-सुविधा नाहीत, कर्मचारी नाहीत. फक्त कर्मचाऱ्यांवर पगार खर्ची पडत आहे. रुग्णालयातील औषधे बाहेर विकली जातात. जर वैद्यकीय अधिकारी नेमलेल्या ठिकाणी रहात नसतील, ते कामावर येण्यास तयार नसतील, तर अशांवर कारवाई करावी. तालुक्यात आरोग्य सुविधा सुधारली नाही, तर दोन ग्रामीण रुग्णालये व सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकाच दिवशी टाळे ठोकू, असा इशारा दिला.
यावेळी सावंत म्हणाले की, तालुक्यात विनापरवाना बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची लूट चालू आहे. तसेच पॅथॉलॉजी लॅबना परवानगी नसताना, विनाकारण गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच पांढऱ्या, तांबड्या पेशी वाढल्याचे कारण सांगून रुग्णांकडून उपचाराच्या नावावर पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांना तुम्ही आळा घालावा व त्यांची चौकशी करावी, असेही सावंत यांनी सांगितले. यावेळी संजय पाटील, जयवंत चौगुले, अविनाश खोत, दिलीप माने, मोहन पाटील, भारत बाबर, संभाजी घागरे, सूरज बाबर उपस्थित होते. (वार्ताहर)
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या आम्हाला अधिकार नाही, तसेच अनेकजण ग्रामीण भागात येण्यास तयार नाहीत. तरीही या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आठ दिवसात नेमणूक करू.
- डॉ. आर. बी. मुगडे
आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर
आरोग्य सेवेचा बोजवारा
शिराळा ग्रामीण रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असताना, दोनच अधिकारी आहेत. कोकरुड ग्रामीण रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नाही. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच अधिकारी आहे. सुरळीत आरोग्य सेवा मिळत नाही. रुग्णालयात सोयी-सुविधा नाहीत, कर्मचारी नाहीत, या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते.