मिरज : मिरज शासकीय कोरोना रुग्णालयातून पळालेला आनंदा रामा काळे (रा. मल्लेवाडी, ता. मिरज) या दरोड्यातील संशयिताला ग्रामीण पोलिसांनी टाकळी रस्त्यावर पकडले. त्याला गांधी चाैक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील दरोडा प्रकरणात आनंदा काळे यास ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास सांगली कारागृहात पाठविण्यात आले होते. कारागृहात कोरोनाची लागण झाल्याने चार दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी मध्यरात्री १२ ते एकच्या दरम्यान तो शासकीय रुग्णालयातून पळून गेल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली होती. याप्रकरणी गांधी चाैक पोलिसांत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी दुपारी दीड वाजता त्याला टाकळी परिसरात आडव्या रस्त्यावर रिक्षातून जात असताना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडले.
चाैकट
काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने घाबरून पलायन
आनंदा काळे कोरोनाबाधित असल्याने त्यास पकडण्यासाठी गेलेल्या ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सतर्कता बाळगली. त्याला हात न लावता तो बसलेल्या रिक्षातून त्यास थेट गांधी चाैक पोलिसांत पोहोच केले. तेथून त्यास पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयामध्ये दररोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याने तेथून घाबरून पलायन केल्याचे काळे याने पोलिसांना सांगितले.