झांबरे खून खटल्यातील साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: October 27, 2014 00:01 IST2014-10-26T23:42:34+5:302014-10-27T00:01:38+5:30
घातपाताची शक्यता : नातेवाइकांची तक्रार

झांबरे खून खटल्यातील साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू
कवठेमहांकाळ : घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष सुभाष झांबरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार विकास विष्णू शिंदे (वय २०, रा. घाटनांद्रे) याचा त्याच्याच द्राक्ष बागेमध्ये रविवारी सकाळी मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत होती.
जानेवारी २०१२ मध्ये घाटनांद्रे येथील सुभाष झांबरे यांचा राजकीय वैमनस्यातून खून झाला होता. विकास शिंदे हा या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. या खटल्याची गेल्या वर्षभरापासून सांगली जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरूआहे. सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये विकास शिंदे याचीही साक्ष पूर्ण झाली होती. तेव्हापासून घाटमाथ्यावर तणावपूर्ण शांतता आहे.
विकास शिंदे शनिवारी दुपारी त्याच्या द्राक्षबागेकडे गेला होता. तेव्हापासून तो घरी आला नव्हता. तो शेतात गेला आहे म्हटल्यावर घरच्यांनीही नेहमीप्रमाणे लक्ष दिले नाही. विकास शिंदे याचा गुहागर- विजापूर मार्गानजीक काही अंतरावर भटकीचे शेत म्हणून परिचित असलेल्या परिसरात मळा आहे. विकास अद्याप घरी का आला नाही, हे पाहण्यासाठी आज, रविवारी सकाळी दहानंतर त्याचे कुटुंबीय व काही मित्र शेतात गेले असता विकासचा मृतदेह मळ््यात आढळला. मृतदेह संशयास्पद अवस्थेत होता. सरपंच अमर शिंदे यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मृतदेहाचे विच्छेदन कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मात्र तपासणीचा अहवाल राखून ठेवला आहे. यामुळे मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
विकासचा मृत्यू हा घातपाती असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात ते उद्या (सोमवार) तक्रार दाखल करणार असल्याचे सरपंच शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)