कासेगाव : श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी भाषणात आजची राजकीय परिस्थिती पाहता “आता आपण शरण जायचे की लढायचे?” असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला केला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘आपण लढायचं’ म्हणत हात वर केले. त्यांच्यासोबत आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनीही हात वर केल्याने उपस्थित जनसमुदायाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेच्या ३९व्या वर्धापन दिन आणि क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांचा ७३वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम कासेगाव (ता. वाळवा) येथे शुक्रवारी झाला. यावेळी डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी शरद पवार अध्यक्षस्थानी उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील, मानसिंग नाईक व संपत देसाई आदी उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात राजकीय बदल झालेले दिसून येत आहेत. सत्तेच्या आत एक व बाहेर एक गट आहेत. लोकांनीही हा बदल स्वीकारला आहे. या परिस्थितीत आपल्यालाही ठोस निर्णय घ्यावा लागेल. डॉ. विश्वजीत कदम यांनी बाबूजी प्रबोधन संस्थेला पाच लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. या कार्यक्रमास माजी सभापती रवींद्र बर्डे, ॲड. बी. डी. पाटील, संजय पाटील, जयदीप पाटील, डॉ. योगेश शिंदे, प्रशांत कदम उपस्थित होते. जयंत निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. केले. ॲड. संदीप पाटील यांनी आभार मानले.
पाटणकर यांचा आदर्श घ्यावा : शरद पवारसांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, पलूस तालुक्याला क्रांतिकारकांचा मोठा इतिहास आहे. बाबूजी पाटणकर यांनी त्या कालखंडात या भागात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचाच आदर्श घेऊन डॉ. भारत पाटणकर यांचे कार्य चालू आहे. त्यांना आमची नेहमीच साथ राहील. नव्या पिढीने हा आदर्श ठेवावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.