सोनी : सोनीसह परिसराला डोंगरवाडी उपसा सिंचनचे पाणी मिळावे, यासाठी वन विभागाची तातडीने परवानगी मिळूनही काम अतिशय संथगतीने चालू आहे. त्याला गती देऊन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पाणी वंचित गावांना मिळावे, अन्यथा बहिष्काराचा निर्णय कायम राहील, असे निवेदन संघर्ष समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यापूर्वी वारणाली येथील पाटबंधारे विभागात झालेल्या बैठकीत आ. सुरेश खाडे यांना समितीच्या सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी आ. खाडे व सदस्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. सोनीसह परिसरातील पाटगाव, भोसे, करोली (एम), सिध्देवाडीसह १७ गावांना म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे, अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा गेल्या दोन महिन्यापासून या गावातील नागरिकांनी घेतला आहे. आ. सुरेश खाडे यांची निष्क्रियता त्यामुळे दिसून येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. ग्रामस्थांनी नेत्यांना गावबंदी तसेच फलक लावून जाहिरातीवर बंदी करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या रेट्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमीन हस्तांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला. पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या, पण चालू करण्यात आलेले काम हे खूपच संथगतीने चालू असल्याचे या समितीने पाहणी केल्यानंतर पाहावयास मिळाले. असेच काम चालू राहिल्यास दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता असल्याने संघर्ष समितीने अतिरिक्त जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांना निवेदन देऊन, काम संथगतीने चालू असून गतीने काम करून पाणी द्यावे, अन्यथा आमचा निर्णय हा ठाम राहील, अशी भूमिका मांडली. यावेळी जगन्नाथ पाटील, अरविंद पाटील, सतीश जाधव, चंपाताई जाधव, उल्हास माळकर, सदाशिव पाटील,भानुदास पाटील, टी. आर. पाटील, कुमार पाटील, अण्णासाहेब पाटील उपस्थित होते.निवेदन देण्यापूर्वी या सर्व कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या वारणाली येथील कार्यालयात बैठक बोलावली होती. यावेळी कामाची चर्चा करताना भाजपचे आ. सुरेश खाडे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना, ही स्टंटबाजी बंद करा, आम्ही आंदोलन केले होते तेव्हा तुम्ही कोठे होता? असा सूर काढला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी, ते आंदोलन बनेवाडीसाठी होते, हे आंदोलन डोंगरवाडी पाण्यासाठी असून, सध्याच्या आंदोलनातील सर्वच कार्यकर्ते तेव्हा होते. चुकीचे आरोप करू नका. पाणी मिळाल्याखेरीज आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने आ. खाडे यांना गप्प बसावे लागले. (वार्ताहर)
सुरेश खाडेंना धरले धारेवर !
By admin | Updated: August 26, 2014 22:20 IST