अशोक डोंबाळेसांगली : शिक्षण, पालकांची मध्यमवर्गीय परिस्थिती होती. तरीही जिद्दीने बारावीच्या परीक्षेत विभागात अकरावा क्रमांक पटकवला. एमपीएससी परीक्षेतून भूमी अभिलेख पदावर थेट निवड झाली. सध्या सांगलीत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या पदावर कार्यरत असलेल्या सुरेखा सेठिया यांचा प्रवास खूपच खडतर आहे. पण, त्यांनी शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर उपक्रमशील काम करून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडताना दिसतात.नांदेड येथे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात सुरेखा सेठिया यांचा जन्म झाला. कुटुंबात शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. पण संस्कार आणि शिस्त होती. त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती १९९४ मध्ये बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर. बारावी कला शाखेत त्या औरंगाबाद बोर्डातून गुणवत्ता यादीत अकराव्या आल्या. त्याच दिवशी त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली, बोर्डाच्या गुणवत्ता यादीत येणे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी देखील आश्चर्याचा सुखद धक्का होता. त्या काळात मुलींचे शिक्षण हा प्राधान्याचा विषयच नव्हता. त्यामुळे सेठिया यांनी मिळवलेले यश होते.कला शाखेची पदवी मिळवली. त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या मैत्रिणीने एमपीएससीची माहिती दिली. जून १९९७ पासून त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. सलग १२ ते १४ तास अभ्यास करून यश अक्षरशः खेचून आणले. २० वर्षांपूर्वीच्या त्या काळात पदवी घेतलेली मुलगी कोणतेही काम न करता घरात बसून अभ्यास करते, ही कल्पनाच मान्य नव्हती. मात्र सेठिया यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खंबीर पाठिंबा दिला.
विक्रीकर निरीक्षक परीक्षेत महिलांमध्ये महाराष्ट्रात पहिल्या
पहिल्याच प्रयत्नात विक्रीकर निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळी महिलांमध्ये त्या महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होत्या. पुन्हा परीक्षा दिल्यानंतर निरीक्षक भूमी अभिलेख पदावर निवड झाली. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर २००१ मध्ये नांदेड तालुका भूमी अभिलेख कार्यालयात त्या निरीक्षक म्हणून दाखल झाल्या.
भूमापनात आणले डिजिटायजेशन..अनेक जिल्ह्यात सेवा बजावून त्या सध्या सांगली येथे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पदावर त्यांना बढती मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येणाऱ्या गावठाण भूमापन, डिजिटायझेशन, ऑनलाइन म्युटेशन इत्यादी योजनांमध्ये त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान, कौशल्य आणि अधिकारवाणी त्यांनी आत्मसात केली आहे. उपक्रमशीलपणे काम करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी एक महिला अधिकारी होण्याचा सन्मान त्यांना मिळाला आहे.
आव्हानात्मक परिस्थितीवर सहज मातस्त्री प्रचंड निर्धारी असते. एखादी गोष्ट तिने ठरवली, मनावर घेतले तर कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीवर ती सहज मात करू शकते. कोणताही अडथळा तिला रोखू शकत नाही. प्रशासनात येणाऱ्या कार्यालयीन अडथळ्यांवर देखील ती लीलया मात करते आणि स्वतःला अपेक्षित असलेले आणि आपल्या खात्याच्या तसेच जनतेच्या हिताचे काम करू शकते. मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देते. नांदेडमध्ये जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख या पदावर कार्यरत सुरेखा सेठिया हे अशा कर्तबगार महिला अधिकारी यांचे उत्तम उदाहरण आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आणि ग्रामीण भागातून भूमिअभिलेखच्या जिल्हा अधीक्षक पदापर्यंत घेतलेली झेप हे सामान्य काम नाही.