वारकऱ्यांच्या पाठिंब्यानेच पंढरपुरात घडले परिवर्तन

By Admin | Updated: May 20, 2016 00:05 IST2016-05-19T23:11:26+5:302016-05-20T00:05:08+5:30

अण्णासाहेब डांगे : प्रकाश बोधले यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार

With the support of Warkaris, the change took place in Pandharpur | वारकऱ्यांच्या पाठिंब्यानेच पंढरपुरात घडले परिवर्तन

वारकऱ्यांच्या पाठिंब्यानेच पंढरपुरात घडले परिवर्तन

मिरज : पंढरपूर मंदिर समितीचा अध्यक्ष म्हणून काम करताना मंदिरात रुक्मिणीदेवीची व्यवस्था, पूजा करण्यास महिलेला परवानगी देऊन परिवर्तन घडविले. या निर्णयास काही फडांच्या प्रस्थापित मंडळींनी विरोध केला. मात्र वारकऱ्यांनी पाठिंबा दिला, असे प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी गुरुवारी येथे केले.
सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा मंडळातर्फे संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वारकरी मेळाव्यात प्रकाश बोधले-महाराज (पैठण) यांना संभाजीराव भिडे गुरुजींच्याहस्ते ‘वारकरी भूषण’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून डांगे बोलत होते. प्रकाश महाराज बोधले यांना ‘ज्ञानोबा तुकोबा वारकरी भूषण’ पुरस्कार देण्यात आला.
डांगे म्हणाले की, सर्व फडांच्या वारकऱ्यांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवावा. फडांची परंपरा सोडून सर्वजण एकत्रित झाले, तर वारकरी संप्रदायास मोठे बळ मिळेल.
छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर वारकरी संप्रदाय टिकू शकला नसता. हिंदू धर्माच्या विरोधात षड्यंत्र सुरु असताना सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, असे संभाजीराव भिडे गुरुजींनी सांगितले.
सध्या महिलांच्या देवदर्शनाच्या अधिकाराबाबत वाद सुरू आहे. मात्र वारकऱ्यांमध्ये पुरुष व महिला असा भेद नाही. विठ्ठलाचे दर्शन सर्वांनी घेण्याची प्राचीन परंपरा असल्याचे प्रकाश महाराज बोधले यांनी सांगितले. रमाकांत बोंगाळे यांनी प्रास्ताविक केले. आम्ही सारे वारकरी एकत्र आहोत. प्रत्येक फडाची वेगळी धोरणे, नियम व सर्व भेद मिटवून वारकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन बोंगाळे यांनी केले.
पंढरपूर मंदिरात सर्व जाती-धर्माच्या व्यक्तींना विठ्ठल पूजेचा मान देऊन डांगे यांनी मंदिर समितीमार्फत परिवर्तन घडविल्याचे भाऊसाहेब नरोटे यांनी सांगितले. वैद्यकीय व्यवसाय करीत वारकरी संप्रदायात क्रियाशील असलेल्या डॉ. चिदानंद चिवटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
नदीवेस येथील विठ्ठल मंदिरात आयोजित वारकरी मेळाव्यास मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ रामचंद्र पाटील, सदाशिव म्हेत्रे, काशिनाथ वाले गुरुजी, श्रीकांत साळुंखे, बिरू हुलवान, प्रभाकर तांदळे, भिकाजी पाटील, पांडुरंग कासार, अर्जुन बाबर उपस्थित होते. (वार्ताहर)


मिरज येथे गुरुवारी प्रकाश महाराज बोधले यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार संभाजीराव भिडे यांच्याहस्ते देण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब नरुटे उपस्थित होते.

Web Title: With the support of Warkaris, the change took place in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.