कृष्णा निवडणुकीत महाडिक गटाची मदत निर्णायक ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:19+5:302021-06-23T04:18:19+5:30
पेठनाका येथे कृष्णा कारखाना निवडणूक संदर्भातील महाडिक गटाच्या बैठकीत डॉ. सुरेश भाेसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राहुल महाडिक, ...

कृष्णा निवडणुकीत महाडिक गटाची मदत निर्णायक ठरेल
पेठनाका येथे कृष्णा कारखाना निवडणूक संदर्भातील महाडिक गटाच्या बैठकीत डॉ. सुरेश भाेसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मागील पाच वर्षांपूर्वी डबघाईला गेलेला कृष्णा कारखाना वाचविण्यासाठी गेल्या निवडणुकीत नानासाहेब महाडिक गटाची साथ मोलाची ठरली आणि आम्ही सत्तेवर आलो. याही निवडणुकीत महाडिक आणि भाेसले कुटुंबीयांच्या जिव्हाळ्याची परंपरा कायम राहील. कृष्णा उद्योग समूहाकडून तुमचा शब्द खाली पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भाेसले यांनी कृष्णेच्या माध्यमातून सगळ्यांना न्याय मिळेल आणि सगळा कारभार न्यायाने चालेल, असे प्रतिपादन केले.
येथील महाडिक शैक्षणिक संकुलात महाडिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक, जिल्हा बॅँकेचे संचालक सी. बी. पाटील, पै. आनंदराव मोहिते, संचालक गिरीष पाटील उपस्थित होते.
डॉ. भाेसले म्हणाले, नानासाहेबांचा वारसा राहुल आणि सम्राट महाडिक समर्थपणे पुढे चालवीत आहेत. महाडिक गटाच्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी चाललेली कृष्णेची कारखानदारी चांगल्या पद्धतीने यापुढील काळातही जोपासली जाईल.
या बैठकीत राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी महाडिक गटाचा जाहीर पाठिंबा डॉ. सुरेश भाेसले यांच्या सहकार पॅनेलला दिला. सी. बी. पाटील म्हणाले, आरोग्य, शिक्षण, शेती आणि उद्योग क्षेत्रांत जयवंतराव भाेसले यांनी मोठे योगदान दिले आहे. डॉ. सुरेश भाेसले यांनी गेल्या पाच वर्षांत कृष्णा कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. त्यामुळे सहकार पॅनेलचा एकतर्फी विजय निश्चित आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, संजय घोरपडे, सतीश महाडिक, अमित ओसवाल, धनाजी पाटील, हर्षवर्धन पाटील, बबन शिंदे, जलाल मुल्ला, संग्राम गोइंगडे, किरण उथळे, वैभव जाखले, डी. के. पाटील, अशोक पाटील, प्रा. दत्तात्रय पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.