दु:खातील कुटुंबांना दिला ‘आधार’
By Admin | Updated: October 23, 2014 22:49 IST2014-10-23T21:16:55+5:302014-10-23T22:49:41+5:30
फराळाचे वाटप : मिरजेत आधार संस्थेचा उपक्रम

दु:खातील कुटुंबांना दिला ‘आधार’
मिरज : एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर वर्षभर त्या कुटुंबात कोणताही सण साजरा केला जात नाही. अशा दु:खी कुटुंबांना मिरजेतील आधार संस्थेतर्फे मागील सात वर्षांपासून दिवाळीत फराळ वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संस्थेतर्फे फराळाचे साहित्य देऊन त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचा आधार दिला जात आहे.
भारतीय समाजात दिवाळी सणाला मोठे महत्त्व आहे. फराळाचे विविध पदार्थ बनवून कुटुंबातील सदस्य, मित्र व नातेवाईकांसह त्याचा आस्वाद घेऊन दिवाळी सण साजरा करण्यात येतो. मात्र एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास दु:खामुळे वर्षभर त्या कुटुंबात दिवाळीसह इतरही सण साजरे केले जात नाहीत. अशावेळी त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडून फराळाचे साहित्य देण्याची प्रथा आहे. मात्र बदलत्या परिस्थितीत कुटुंबातील दुरावा वाढल्याने ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहे. दु:खात असलेल्यांना आधार देण्याची ही प्रथा जिवंत ठेवण्यासाठी फराळाचे पदार्थ देण्याचा उपक्रम मिरजेतील आधार संस्थेने सुरू केला आहे.
शहरात गेल्या वर्षभरात निधन झालेल्या नागरिकांची माहिती संस्थेकडे संकलित करण्यात येते. संस्थेचे कार्यकर्ते याची नोंद ठेवतात व दिवाळीपूर्वी महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातूनही माहिती घेण्यात येते. व्यक्तीचे निधन झालेल्या कुटुंबियांना त्यांच्या घरी जाऊन संस्थेचे कार्यकर्ते फराळाचे साहित्य व सांत्वन पत्र देतात. संस्थेचे मोहन वाटवे, मकरंद देशपांडे, अमित पटवर्धन, प्रसन्न चिप्पलकट्टी, वाय. सी. कुलकर्र्णी यासाठी प्रयत्न करतात. (वार्ताहर)