सांगलीत कृष्णाकाठ पणत्यांनी उजळला

By Admin | Updated: November 15, 2016 00:32 IST2016-11-14T23:32:10+5:302016-11-15T00:32:33+5:30

‘वीर जवान तुझे सलाम ! : ‘एक पणती जवानांसाठी’ उपक्रम; पणत्या प्रज्ज्वलित केल्यानंतर वातावरण धीरगंभीर

Sunglasses made by the monks in Sangli, Krishna | सांगलीत कृष्णाकाठ पणत्यांनी उजळला

सांगलीत कृष्णाकाठ पणत्यांनी उजळला

सांगली : ‘भारतमाता की जय’, ‘वीर जवान तुझे सलाम’, ‘वंदेमातरम्’ अशा जयघोषात आणि सामाजिक भान जपत सैनिकांच्या कृतज्ञतेपोटी लावलेल्या पणत्यांनी येथील कृष्णाकाठ सोमवारी सायंकाळी उजळून गेला. धीरगंभीर वातावरणात ‘वीर जवान तुझे सलाम! : एक पणती जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. सांगलीकरांनी कृष्णाकाठावर गर्दी करत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सीमेवर लढताना नुकतेच वीरमरण आलेले दुधगाव (ता. मिरज) येथील शहीद जवान नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांच्याहस्ते पणती लावून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित सांगलीकरांनी सुरुवातीला वसंत स्फूर्तिस्थळ परिसरात पणत्या लावल्या. यावेळी ‘वीर जवान तुझे सलाम’ असा मजकूर लिहिलेल्या पणत्या प्रज्ज्वलित केल्यानंतर वातावरण धीरगंभीर बनले.
यावेळी बोटीमध्ये पणत्यांच्या माध्यमातून अशोक चक्राची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. नदीमध्ये त्या पणत्या प्रज्ज्वलित करण्यात येत होत्या. शहीद नितीन कोळी यांच्या पत्नी संपदा कोळी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या पत्नी वंदना गायकवाड, शैलजा पाटील, ऐश्वर्या पाटील आदींनी बोटीतूनच माई घाटापर्यंत येत पणत्या प्रज्वलित केल्या. यानंतर उपस्थित नागरिकांच्या उपस्थितीत माई घाटावरही पणत्या लावण्यात आल्या. यावेळी पाण्यात सोडण्यात आलेल्या पणत्यांमुळे नदीपात्र आकर्षक दिसत होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर, वंदना गायकवाड, आभाळमाया फाऊंडेशनचे प्रमोद चौगुले, एम. एस. राजपूत, नारायण उंटवाले, दत्ता पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष गोपाल मर्दा, शहीद नितीन कोळी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)


जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कृष्णाकाठ पणत्यांनी उजळविण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने गेला आठवडाभर या उपक्रमाचे नियोजन सुरू होते. सायंकाळच्या सुमारास संपूर्ण कृष्णाकाठ पणत्या आणि त्या प्रज्ज्वलित करण्यासाठी पुढे सरसावलेल्या सांगलीकरांच्या गर्दीने भरून गेला होता.

Web Title: Sunglasses made by the monks in Sangli, Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.