सांगलीतील टोलवसुलीचा अतिरेक झाला, तेव्हा सर्वपक्षीय कृती समिती रस्त्यावर आली. टोलचे जोखड हाणून पाडले. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाची मिरजेशी संलग्नता तोडण्याचे काहूर उठले, तेव्हाही समितीने रान उठवले. आता कोरोना काळातही रुग्णसेवेसाठी समिती अहोरात्र रस्त्यावर उतरली आहे. कोरोना रुग्ण सहाय्यता समितीच्या भूमिकेत तिचे काम सुरु झाले आहे.
सजग सांगलीकरांनी शहरातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकत्र येत समितीला आकार दिला. कोरोना व लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने क्षमतेचा कस लागला. सरकारी मानसिकतेशी लढा देण्याबरोबरच रुग्णांना उभारी देण्यापर्यंतची प्रत्येक कामगिरी समिती करत आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक झाला, तेव्हा बेड मिळणे हीच मोठी लढाई होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासन, महापालिका व आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधत बेड उपलब्ध केले. रात्री-बेरात्री रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन घेऊन बेड मिळवून दिले. अवाजवी बिले, बेडची अडवणूक, रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई यांचाही सामना केला.
व्हेंटिलेटर बेडअभावी रुग्णांची तडफड पाहून लोकसहभागातून पोर्टेबल ऑक्सिजन यंत्रे उपलब्ध केली. त्याचा खूपच फायदा झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही तीस यंत्रांच्या माध्यमातून रुग्णांना प्राणवायू देण्याचे काम सुरु आहे.
पहिल्या टप्प्यात बेरोजगारांच्या चरितार्थाचा प्रश्न मोठा होता, त्यासाठी कार्यकर्त्यांनी अन्नधान्य वाटप मोहीम राबवली. सामाजिक दातृत्वातून शिधावाटप केले, औषधेही दिली. गृह अलगीकरणातील रुग्णांना ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय मदत पुरवली. पोलीस व स्वच्छता कर्मचाऱ्यांना चहा-नाश्ता देऊन त्यांचा उत्साह वाढवला. सध्या दुसऱ्या लाटेतही मोहीम सुरुच आहे. विशेषत: रेमडेसिविर इंजेक्शनच्या टंचाई काळात समिती समन्वयकाच्या भूमिकेत आहे.
प्रमुख कार्यकर्ते सतीश साखळकर, नगरसेवक अभिजित भोसले, महेश पाटील, धनेश शेटे, असीफ बावा, प्रशांत भोसले, आनंद देसाई, रवींद्र यादव, राहुल पाटील, धनंजय वाघ, प्रदीप कांबळे, आदी कोरोनाच्या आघाडीवर लढा देत आहेत.