‘ताकारी, टेंभू’चा ऐन उन्हाळ्यात दिलासा

By Admin | Updated: May 26, 2015 00:53 IST2015-05-25T23:06:09+5:302015-05-26T00:53:52+5:30

कडेगाव तालुक्यातील चित्र : नियोजनानुसार आवर्तनांमुळे शेतकऱ्यांमधून समाधान

The summer solstice of 'Takaar, Tembhu' | ‘ताकारी, टेंभू’चा ऐन उन्हाळ्यात दिलासा

‘ताकारी, टेंभू’चा ऐन उन्हाळ्यात दिलासा

प्रताप महाडिक - कडेगाव -ताकारी आणि टेंभू या दोन्ही सिंचन योजनांची आवर्तने यावर्षी नियोजित वेळेनुसार मिळाली आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लाभक्षेत्रातील शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासली नाही. त्यामुळे कडेगाव तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.
कडेगाव तालुक्यात प्रत्येकवर्षी ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनतो. उन्हाळा सुरू झाला की लगेचच अनेक गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु अलीकडच्या काही वर्षांत ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी आले आणि पाणीटंचाई कमी झाली. सुरूवातीच्या काळात वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे दोन्ही योजनांच्या पहिल्या आवर्तनास थोडासा विलंब लागला. परंतु तरी वीजबिल थकबाकी भरण्याची व्यवस्था झाली आणि दोन्ही योजनांचे पहिले आवर्तन सुरू झाले. त्यानंतर दुसरे, तिसरे आणि सध्या चौथे आवर्तनही नियोजित वेळेनुसार सुरू आहे.
टेंभू योजनेच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातील ४५०० हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळते. योजनेचे चौथे आवर्तन सुरू आहे. टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याच्या अस्तरिकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. यामुळे आवर्तन सुरू झाले की पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय पोटकालव्यांचीही कामेही अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच कडेगाव तालुक्यातील ९५०० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळेल. त्यामुळे पाणीपट्टीचे दरही कमी होतील. वसुली योग्यप्रकारे होईल आणि योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहण्यास कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
एकंदरीत दोन्ही योजनांच्या माध्यमातून कडेगाव तालुक्याला ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन्ही योजनांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि लाभक्षेत्रामध्ये वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

अपुरा कर्मचारी वर्ग
ताकारी आणि टेंभू दोन्ही योजनांचा स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग सुरू झाला आहे. लाभक्षेत्र मोजणी, पाणीपट्टी आकारणी, पाणीपट्टी वसुली, आवर्तनांचे नियोजन ही कामे या विभागाकडे सोपविली आहेत. परंतु या विभागाकडे दोन्ही योजनांसाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे. यामुळे ही कामे केवळ ३० ते ४० टक्के कर्मचारी पूर्ण करू शकत नाहीत. शासन नवीन कर्मचारी भरती करीत नाही आणि कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती करीत नाही. यामुळे सिंचन व्यवस्थापन विभाग अडचणीत सापडला आहे.

यापुढे अडचण नाही...
कडेगाव तालुक्यातील ६५०० हेक्टर लाभक्षेत्राला ताकारी योजनेद्वारे पाणी मिळत आहे. काही पोटकालव्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण होताच लाभक्षेत्रातही वाढ होईल. लाभक्षेत्र वाढताच पाणीपट्टी दर कमी करता येतील. यामुळे पाणीपट्टी वसुलीलाही चांगला प्रतिसाद मिळेल. परिणामी वीजबिलाची थकबाकीही राहणार नाही. या साऱ्याचे फलित म्हणून सातत्य राहून योजना कार्यक्षमपणे चालवता येईल. सध्या ६२५० रुपये प्रति एकर इतकी पाणीपट्टी ऊस पिकासाठी आकारली जाते. ही पाणीपट्टी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून वसूल करून घेतात आणि योजनेकडे भरतात. ताकारी योजनेचे सध्या चौथे आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने एप्रिल २०१५ अखेरचे वीजबिलही भरले आहे. आता चौथ्या आवर्तनाचे वीजबिलही पाणीपट्टी वसुलीतून भरण्यास कोणतीही अडचण नाही, त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: The summer solstice of 'Takaar, Tembhu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.